जिंदाल पॉलिमर जळीतकांड प्रकरणी व्यवस्थापनातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

जिंदाल पॉलिमर जळीतकांड प्रकरणी व्यवस्थापनातील ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई – विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या दौऱ्यानंतर इगतपुरी येथील जिंदाल पॉलिमर जळीतकांड प्रकरणातील तिघांच्या मृत्यू व जखमींप्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार १९ फेब्रुवारी रोजी जिंदाल पॉलि फिल्म प्रा. लि. कंपनीतील दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

या पाहणीनंतर त्यांनी या दुर्घटनेला कंपनी प्रशासनच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर दानवे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर दोन दिवसांतच कंपनी व्यवस्थापनातील सात जणांविरोधात आरोप दाखल करण्यात आलेले आहेत. घोटी पोलीस स्टेशन येथे सात जणांविरुद्ध निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे जखमी व मृतांना दानवे यांच्या पाठपुराव्यामुळे न्याय मिळणार आहे.

जिंदाल पॉली फिल्म जळीत कांड प्रकरणी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, नाशिक व संबंधित विभागांकडून पोलिसांना उपलब्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार ज्या बॅच पॉली प्लँटमध्ये प्रथमतः आग लागली होती, तो बॅच पॉली प्लँट हा सुमारे दीड महिन्यांपासून बंद होता. सदर प्लँट सुरू करण्यापूर्वी त्याची तपासणी व दुरुस्ती होऊन तो सुरू करताना मानक ऑपरेटिंग प्रक्रियेचे (एसोपीचे) पालन न केल्याने प्लँटमधून थर्मिक फ्लूईड ऑईलची गळती होऊन आग लागल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात १ पुरुष व २ महिला कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर २२ जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी जिंदाल पॉलि फिल्म प्रा. लि. कंपनीचे भोगवटदार, कारखाना मॅनेजर,पॉलि फिल्म प्लँट बिझनेस हेड, प्रोडक्शन मॅनेजर, मेन्टेनन्स विभागप्रमुख, प्रोडक्शन डिपार्टमेंट शिफ्ट इंचार्ज आणि प्लँट ऑपरेटर यांच्याविरोधात कलम ३०४(अ), ३३७, ३३८,२८५,२८७,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on: February 22, 2023 9:17 PM
Exit mobile version