मुंबईत गॅस गळती नाही; अग्निशमन दलाने केली खात्री

मुंबईत गॅस गळती नाही;  अग्निशमन दलाने केली खात्री

गोवंडी, भांडूप, पवई, विक्रोळी, घाटकोपर या भागातून रात्री गॅस गळतीच्या तक्रारी आल्याची माहिती महानगरपालिकेच्या आपात्कालीन विभागाकडून देण्यात आली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात काल रात्री मोठ्या प्रमाणत गॅसची दुर्गंधी पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात तक्रारी अग्निशमन दलाला आल्या होत्या. या तक्रारींच्या आधारे अग्निशमन दलाकडून १७ गााड्या घटनास्थळी दाखल झाल्या. महापालिकेचे अधिकारी आणि अग्निशमन दलाकडून तपासणी केल्यानंतर या कोणत्याही भागात गॅस गळती होत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाकडून अद्यापही तपासणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

गॅस गळतीचे कारण आणि स्त्रोताचा शोध सुरू

तसेच, मुंबई महापालिकेनं नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केले आहे. परिस्थिती नियंत्रणात असून गॅस गळतीचे कारण आणि स्त्रोत याचा शोध सुरू असल्याचेही सांगण्यात येत आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आजूबाजूच्या भागांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, राष्ट्रीय रसायन व खत्याच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशीच्या सूचना देण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अग्निशमन दलाने केली खात्री

काही नागरिकांनी सोशल मिडीयाद्वारे या गॅस गळतीची शक्यता वर्तवली होती. याची माहिती मुंबई अग्निशमन दलाला मिळताच रात्रभर विविध ठिकाणी शोध घेतला. त्याच बरोबर दक्षता म्हणून ज्या ठिकाणावरून तक्रारी आल्या होत्या तिथे जाऊन दक्षतेबाबत घोषणा करण्यात आल्या. गोवंडी मधील एका औषध कंपनी मधून हा गॅस लिकेज झाल्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली होती. तशी लेखी तक्रार ही केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इथे देखील जाऊन रात्री पाहणी केली. दरम्यान तेथील परिस्थिती चांगली असून घाबरुन न जाण्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं आहे.

पर्यावरण मंत्र्यानी केले घरातच राहण्याचे आवाहन

दरम्यान, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, मुंबईच्या काही भागात पसरलेल्या दुर्गंधीसंदर्भात, आतापर्यंत मुंबई फायर ब्रिगेडने काम सुरू केले आहे. त्यांनी सांगितलं आहे की, कोणीही घाबरू नका, मी सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन करतो. घराच्या खिडक्या बंद करा. मुंबई महापालिका या परिस्थितीवर नजर ठेवून आहे, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, अग्निशमन विभाग याचा शोध घेत आहे, लिकेजचा मूळ स्त्रोत सापडताच कळवले जाईल, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

अग्निशमन दलाच्या १७ गाड्या घटनास्थळी

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, पवई आदी विभागात रात्री पावणे बारा सुमारास गॅस गळतीचा वास येऊ लागला होता. गॅसचा उग्र वास येत असल्याने या विभागांमधून मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी नागरिकांनी ट्विटरच्या माध्यमातून नोंदवल्या. गॅस गळतीच्या अनेक तक्रारी येऊ लागल्याने मुंबई अग्निशमन दलाने आपल्या १७  गाड्या पाठवत गॅस लिकेजचा शोध घेतला गेला आहे.

First Published on: June 7, 2020 10:39 AM
Exit mobile version