सोशल मीडियातून शिक्षकांचे सरकारविरोधात रण

सोशल मीडियातून शिक्षकांचे सरकारविरोधात रण

(फोटो प्रातिनिधिक आहे)

‘भाजप-शिवसेना युतीला पळवा… महाराष्ट्राला वाचवा’ अशी साद राज्यातील कायम विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनी व्हाट्ॅसअपच्या माध्यमातून नागरिकांना घातली आहे. शाळांना 100 टक्के अनुदान देण्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने शिक्षक व शिक्षक संघटनांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. मागण्या मान्य न झाल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारलेले हे आंदोलन भविष्यात अधिकच तीव्र करण्यात येणार असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले आहे.

राज्यातील प्राथमिक व माध्यमिकच्या दोन हजार 417 शाळा व चार हजार 562 तुकड्यांना 2016 मध्ये तत्कालिन सरकारने 20 टक्के अनुदान मंजूर केले होते. मात्र त्यामुळे या शाळेतील शिक्षकांना तुटपुंज्या पगारावर घर चालावावा लागत आहे. त्यामुळे 100 टक्के किंवा प्रचलित नियमानुसार अनुदान मिळावे यासाठी या शाळेतील शिक्षक 5 ऑगस्टपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. शिक्षकांच्या मागणीकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने सरकारच्या निषेधासाठी व नागरिकांना आंदोलनाची माहिती व्हावी यासाठी शिक्षकांनी आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याला हवा दिली. ‘भाजप-शिवसेना युतीला पळवा… महाराष्ट्राला वाचवा’ अशी साद घालणारे व्हॉट्सअप डीपी कायम विना अनुदानित शाळेतील प्रत्येक शिक्षकाने ठेवला आहे.

तसेच शिक्षकांच्या विविध ग्रुपचा डीपीसुद्धा हाच ठेवण्यात आला आहे. या डीपीमध्ये कमळ व धनुष्यबाणावर फुली मारत भाजप-शिवसेना युतीला पळवा… महाराष्ट्राला वाचवा असे वाक्य लिहिले आहे. राज्यातील शिक्षकांनी डीपीच्या माध्यमातून पुकारलेल्या आंदोलनाची शिक्षकांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे शिक्षकांच्या मागण्यांबाबत योग्य तोडगा न निघाल्यास सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

भाजप-शिवसेनेच्या सरकारकडून शिक्षकांची होत असलेली अवहेलना सर्वांना माहित व्हावी यासाठी आम्ही व्हॉट्सअपची मदत घेतली. शिक्षकांवर अन्याय करणार्‍या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही
– प्रशांत रेडिज, प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती

First Published on: September 8, 2019 1:53 AM
Exit mobile version