आशियातील पहिल्या महिला लोको पायलटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, सातारच्या कन्येने केली ‘ही’ कामगिरी

आशियातील पहिल्या महिला लोको पायलटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, सातारच्या कन्येने केली ‘ही’ कामगिरी

मुंबई : आशियातील पहिल्या महिला लोको पायलट सुरेखा यादव यांनी आज (१३ मार्च) सोलापूर-सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालवत मध्य रेल्वेच्या शिरपेचात एक महिला वंदे भारत एक्सप्रेस लोको पायलट म्हणून नाव कोरले. यानिमित्ताने सुरेखा यादव यांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक ८ वर सत्कार करण्यात आला.

सुरेखा यादव म्हणाल्या की, नवीन काळातील, अत्याधुनिक तंत्रज्ञान वंदे भारत ट्रेनचे पायलट करण्याची संधी दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. गाडी योग्यवेळी सोलापूरहून निघाली आणि वेळेच्या ५ मिनिटे आधीच सीएसएमटीला पोहोचली. ट्रेन चालविण्याच्या शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये सिग्नल पाहणे, नवीन उपकरणे वापरणे, इतर क्रू मेंबर्ससोबत समन्वय, ट्रेन चालवण्यासाठी सर्व पॅरामीटर्स पाळणे यांचा समावेश होतो.

महाराष्ट्राच्या सातारा येथील सुरेखा यादव या 1988 मध्ये भारतातील पहिल्या महिला रेल्वे चालक बनल्या. त्यांच्या कामगिरीसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सुरेखा यादव यांचे स्वप्न
अभ्यासादरम्यान सुरेखा यादव सामान्य मुलींप्रमाणे त्यांच्या करिअरची आणि भविष्याची स्वप्ने पाहायच्या. त्या काळात त्यांना लोको ड्रायव्हर नाही तर शिक्षिका व्हायचे होते. शिक्षक होण्यासाठी त्यांनी बी-एड पदवी मिळवण्याची योजना आखली होती. मात्र, नंतर त्यांचा मार्ग बदलला आणि त्या रेल्वेमध्ये रुजू झाल्या.

रेल्वेत नोकरी
सुरेखा यांना तांत्रिक पार्श्वभूमी आणि ट्रेन्सची ओढ असल्यामुळे त्यांनी पायलटसाठी फॉर्म भरला. 1986 मध्ये त्यांची लेखी परीक्षा होती, ती उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी मुलाखतही पास केली. पुढे सुरेखा यांची कल्याण ट्रेनिंग स्कूलमध्ये सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरेखा यादव यांना 1989 मध्ये नियमित सहाय्यक चालक पदावर बढती मिळाली.

सुरेखा यादव यांची कारकीर्द
सुरेखा यांनी सर्वप्रथम गुड्स ट्रेन ड्रायव्हर म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. हळूहळू त्याचे ड्रायव्हिंग कौशल्य चांगले होत गेले. 2000 मध्ये त्यांना मोटर वुमन पदावर बढती मिळाली. त्यानंतर 2011 मध्ये सुरेखा एक्सप्रेस मेलच्या पायलट बनल्या. यासह सुरेखा यादव यांना महिला दिनानिमित्त आशियातील पहिली महिला रेल्वे चालक होण्याचा मान मिळाला. सुरेखा यांनी पुण्यातील डेक्कन क्वीन ते सीएसटी या सर्वात धोकादायक रेल्वे मार्गावर ट्रेन चालवली आहे.

 

First Published on: March 13, 2023 8:53 PM
Exit mobile version