मधुमेहाचे गैरसमज दूर करणारा वॉकथॉन

मधुमेहाचे गैरसमज दूर करणारा वॉकथॉन

थकलेल्या बाबांसाठी शाळकरी मुलेच बनणार डायबेटिक मॉनिटर!

मधुमेहातील आहार आणि उपचार हा अत्यंत दुर्लक्षित विषय असून भारतातील मधुमेही रुग्ण आहार संकल्पनेच्या बाबतीत अशिक्षितच असून आता बच्चे कंपनीने मधुमेहाविषयी असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. बोरीवली येथील अपेक्स ग्रुप ऑफ रुग्णालयाच्या वतीने येत्या ९ डिसेंबर रोजी बोरीवली येथे शाळकरी मुलांचे वॉकथॉन आयोजित केली आहे. या वॉकथॉनमध्ये बच्चे कंपनी मधुमेहाविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

हे आहेत गैरसमज

अनेकदा मधुमेह असल्याचे निदान झाल्यानंतर बऱ्याच व्यक्ती गोड खाणे टाळतात. तसेच अधिक प्रमाणात कडू खाण्यास सुरुवात करतात. हाच गैरसमज बच्चे कंपनी दूर करणार आहेत. मला मधुमेहाचा त्रास आहे म्हणून मी कारल्याचा रस घेतो, सकाळी कडुनींब खातो, गेली १० वर्षे मी आंबा खाल्लेला नाही अशा प्रकारच्या अनेक गप्पा मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी रंगलेल्या असतात. एखादे औषध मधुमेही रुग्णाला लागू झाले तर तेच औषध दुसऱ्या रुग्णाला लागू पडेल याची शाश्वती नसते. तरीही बरेच रुग्ण ते औषध अनेक वर्षे घेत राहतात आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम देखील होतो. एखाद्या ऐकीव उपचारावर अंधविश्वास ठेवून अनेक मधुमेही रुग्ण आपले आयुष्य धोक्यात देखील आणतात. हा गैरसमज कमी व्हावा याकरता या वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.


वाचा – भारतात मधुमेह ६४ टक्क्यांनी वाढला


हा संदेश दिला जाणार

बोरीवलीतील चंदावरकर रोड, भाबई नाका, स्टेशन रोड असा २ ते ३ किलोमीटर परिसरात सकाळी ८ ते १० या वेळेत ही वॉकथॉन होणार असून यामध्ये सेंट रॉक्स स्कूल आणि स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल मधील १० ते १४ वयोगटातील दीडशे मुले सहभागी होणार आहेत. कारल्याचा अथवा दुधीभोपळ्याचा रस पिऊन मधुमेह घालवा, अशी जाहिरातबाजी आजूबाजूला मोठय़ा प्रमाणावर सुरू आहे. परंतु मधुमेहातील वैद्यकीय गुंतागुंतींचा विचार करता योग्य डॉक्टर अथवा रुग्णालय निवडणे आणि त्यांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे हाच संदेश या वॉकथॉनमधून दिला जाणार आहे.

मधुमेहाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून याविषयी असलेले गैरसमज जर दूर केले तरच त्याच्याशी दोन हात करणे सोपे जाईल. मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण, व्यायाम, औषधोपचार, या आजाराविषयीचे पुरेसे ज्ञान या बाबींचा प्रसार आणि प्रचार करणे महत्वाचे आहे. म्हणूच आम्ही शाळेतील मुलांना एकत्र करून ही वॉकथॉन करणार आहोत. जेणेकरून बालवयातच त्यांना मधुमेहाविषयी योग्य माहिती मिळेल आणि हा आजार जाणून घेण्याविषयी अधिक जिज्ञासा तयार होईल. या वॉकथॉननंतर आम्ही या मुलांना मधुमेहाविषयी योग्य व सविस्तर माहिती देणार असून ते अपेक्स ग्रुप ऑफ रुग्णालय समूहाचे ‘मधुमेह दूत’ असणार आहेत. आपल्या राहत्या वस्तीत अथवा संकुलामध्ये मधुमेहाविषयी योग्य माहिती देण्यासाठी या बच्चे कंपनीचा हातभार लागणार आहे.  – डॉ इंदूमती कुबेरन, मधुमेहविकार तज्ञ


वाचा – जगातील ४९ टक्के मधुमेही भारतात


 

First Published on: December 6, 2018 8:13 PM
Exit mobile version