बांगलादेशी नागरिकांना बोगस दस्तावेज देणार्‍या पाच जणांना अटक

बांगलादेशी नागरिकांना बोगस दस्तावेज देणार्‍या पाच जणांना अटक

संशयातून प्रेयसीची हत्या करणाऱ्या प्रियकराला जन्मठेप

बांगलादेशी नागरिकांना बोगस दस्तावेज बनवून देणार्‍या पाच जणांच्या एका टोळीला गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्यात दोन बांगलादेशी नागरिकांसह तीन एजंटचा समावेश आहे. रेहान शुओन, मिनाझुल हसन, हमीदअली खान, शत्रुजित यादव आणि निरजकुमार विश्वकर्मा अशी या पाच जणांची नावे आहेत.

यातील रेहान आणि मिनाझुल हे दोघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान पासपोर्टची शहानिशा करताना स्थानिक पोलिसांकडून हलगर्जीपणा झाल्याचे दिसून आले असून या पोलिसांवर लवकरच योग्य ती कारवाई केली जाणार आहे. 6 नोव्हेंबरला रेहान हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबई येथे जाण्यासठी आला होता. यावेळी त्याला बोगस पासपोर्ट बाळगल्याप्रकरणी विमानतळ अधिकार्‍यांनी ताब्यात घेऊन सहार पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांतर्गत गुन्हा नाेंंदविण्यात आला होता.

याच गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस तपासात रेहान हा मूळचा बांगलादेशच्या बालागंज, फेंजगंजच्या मोदुराईचा रहिवाशी असून काही महिन्यांपूर्वी तो भारतात आला होता. त्यानंतर तो घाटकोपर परिसरात राहत होता. याच दरम्यान त्याने बोगस आधार आणि पॅन कार्ड बनवून घेतले होते. या दोन्ही कार्डवरुन त्याने जून 2019 रोजी पासपोर्ट कार्यालयातून एक पासपोर्ट बनवून घेतला होता. तिथे राहत असताना त्याने त्याचा मित्र मिनाझुल याला बोलावून घेतले होते. त्यानंतर त्यानेही अशाच प्रकारे बोगस भारतीय दस्तावेज बनवून घेतले होते. त्याच्या घरी पोलिसांनी छापा टाकून नंतर मिनाझुलला अटक केली. याच पत्त्यावर त्यांनी गुमास्ता आणि उद्योग आधार परवाना बनवून घेतला होता. या दोघांनंतर त्यांचा इतरांना भारतात आणून त्यांना भारतीय नागरिकत्व मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.

त्यानंतर या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. याच दरम्यान या दोघांनाही साकिनाका परिसरातून पोलिसांनी अटक केली. त्यांच्या चौकशीत त्यांना आधारकार्ड बनवून देण्यासाठी निरजकुमार याने मदत केली ोती. निरजकुमार हा अनेकांना बोगस रेशनकार्ड, पॅनकार्ड, आधारकार्ड, इलेक्ट्रीक बिल बनवून देत होता. त्याला बुधवारी 4 डिसेंबरला सांताक्रुज येथील कालिना येथून पोलिसांनी अटक केली. अशा प्रकारे या तिघांनी दोन्ही बांगलादेशी नागरिकांना बोगस दसतावेज बनवून दिले होते. या दस्तावेजनंतर त्यांनी पासपोर्ट मिळविले होते. अशा प्रकारे बोगस दस्तावेज बनवून देणारी ही सराईत टोळी असून त्यांच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे करण्यात पोलिसांना यश आले आहे.

First Published on: December 6, 2019 1:01 AM
Exit mobile version