हल्ल्याचे गांभीर्य? महाराष्ट्रात घडत होते उद्घाटन सोहळे

हल्ल्याचे गांभीर्य? महाराष्ट्रात घडत होते उद्घाटन सोहळे

पुलवामातील आत्मघातकी हल्ल्यात ४० जवानांचे हकनाक बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर सारा देश दु:ख सागरात बुडाला असताना सत्ताधारी पक्षाचे नेते मात्र आपल्या नियोजित उद्घाटनांच्या कार्यक्रमांमध्ये मश्गूल आहेत. देशभर शहिदांना श्रध्दांजली अर्पिली जात असताना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यक्रमांचा सपाटा तसाच सुरू ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सत्ताधारी भाजपच्या या कृतीवर जोरदार नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

शुक्रवारी दुपारी अनंतनाग जिल्ह्यातील पुलवामात जम्मूतून श्रीनगरकडे जाणार्‍या केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या ७८ वाहनांच्या ताफ्यावर झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात ४० हून अधिक जवान धारातीर्थी पडले. या घटनेने सारा देश सुन्न झाला. जगभर या घटनेची निंदा होत आहे. देशभर सर्वच संस्था आणि संघटना सर्वच राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपले सगळे कार्यक्रम रद्द केले.

काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रमुख प्रियांका गांधी या शुक्रवारीच पहिली पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र, घटनेची तीव्रता पाहून त्यांनी आपली पत्रकार परिषद रद्द केली. मात्र, दुसरीकडे अमित शहा यांनी आपली पत्रकार परिषद तशीच सुरू ठेवली. इतकेच नव्हे तर हल्ला झाल्याच्या सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीची चर्चा करण्यासाठी ‘मातोश्री’वर पोहोचले होते. हल्ल्याचे गांभीर्य न ठेवता त्यांनी चर्चा उरकल्यानंतरच ‘मातोश्री’ सोडल्याचे पहायला मिळाले.

घटनेच्या दुसर्‍या दिवशी देशभर अराजक अशी परिस्थिती निर्माण झाली होती. सर्वत्र निषेधाचा सूर होता. अनेक ठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात मोर्चे आणि निदर्शने सुरू असताना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम टाळले. याला अपवाद देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्रम होते. महाराष्ट्राच्या दोन वीर जवानांच्या अंत्ययात्रेत सर्वांच्या डोळ्यात अश्रृ असताना याच दिवशी मोदी हे धुळ्यातील जाहीर कार्यक्रमात सहभागी झाले आणि त्यांनी धुळे-नरडाणा या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. जळगाव-मनमाड या नियोजित रेल्वे मार्गाचा पायाभरणी आणि भुसावळ-वांद्रे या खान्देश एक्स्प्रेसला व्हिडिओ लिंकद्वारे पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. याशिवाय १००० कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण करून टाकले. धुळ्यातील आपल्या भाषणात मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख केला. मात्र, सरकारची भलामण करायलाही ते विसरले नाहीत.

विशेष म्हणजे देशावर आपत्कालीन परिस्थिती आल्यावर विरोधी पक्ष नेत्यांबरोबर चर्चा घडवली जाते. ही बैठक शनिवारी बोलवण्यात आली तेव्हा विरोधी पक्षांबरोबरील चर्चा गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांभाळली. जे कामे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी करायची ती सिंग यांच्यावर सोडून मोदी हे धुळ्यातील कार्यक्रमात होते. आजही दु:खाचे गांभीर्य जराही कमी झालेले नाही. तरीही रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी उद्घाटनांचा बार फोडला.जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने उरण येथील जासई गावात उभारायला घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपूर्ण असलेल्या स्मारकाचे उद्घाटन या दोन नेत्यांनी घाईघाईत उरकून घेतले. सत्ताधार्‍यांची ही उद्घाटनांची मालिका लक्षात घेता या पक्षाला पुलवामाच्या घटनेचे गांभीर्य कमी आणि निवडणुकीच्या प्रचाराची पडली असल्याची टीका होऊ लागली आहे.

सत्ताधारी हे देशाचे दुर्दैव
पुलवामातील भीषण घटनेनंतर सत्ताधार्‍यांनी अधिक जबाबदारीने वागले पाहिजे, पण भाजपच्या नेत्यांना साधे गांभीर्य राहिलेले दिसत नाही. दोन दिवस थांबले असते तर काही बिघडले नसते. तिथे दिल्लीत विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलवले जाते आणि पंतप्रधान धुळ्यात उद्घाटने करतात ही बाबा खूपच वाईट आहे. नेहरु बंदरातील कार्यक्रमही मुख्यमंत्र्यांना टाळता आला असता.
– अजित पवार,माजी उपमुख्यमंत्री

यांना कुठल्या शब्दात सांगायचे?
मुख्यमंत्री फडणवीस इतरांना शहाण्याचे डोस पाजतात. एकीकडे सैनिक धारातीर्थी पडत असताना दुसरीकडे पंतप्रधानांचे कार्यक्रम महाराष्ट्रात घडतात. महाराष्ट्राचे दोन वीर जवान धारातीर्थी पडल्याची जाणीवही आमच्या मुख्यमंत्र्यांना नसावी, हे या राज्याचे दुर्देवच म्हटले पाहिजे.
– पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री

First Published on: February 18, 2019 5:44 AM
Exit mobile version