लेखक डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

लेखक डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे मराठी भाषेतील समीक्षक व ललित लेखक होते. मराठी लेखिका आणि समीक्षक विजया राजाध्यक्ष यांचे ते पती. त्यांचा जन्म ७ जून १९१३ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण छबिलदास हायस्कूल तर महाविद्यालयीन शिक्षण एलफिन्स्टन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन जीवनात इंग्रजी साहित्यातील वर्डस्वर्थ पारितोषिक त्यांनी पटकावले होते. १९३६ ते १९७१ या काळात अहमदाबाद येथील गुजरात कॉलेज, मुंबई येथील इस्माईल युसूफ तसेच एलफिन्स्टन महाविद्यालय आणि कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय येथे त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

राजाध्यक्ष यांनी पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे मुख्य संपादक म्हणूनही काही काळ काम पाहिले. त्यांनी आपल्या लेखनाची सुरुवात ‘अभिरुची’ मासिकातून केली. या मासिकात ‘निषाद’ या टोपणनावाने प्रसिद्ध झालेले ‘वाद-संवाद’ हे त्यांचे सदर खूप गाजले. ‘पाच कवी’ (१९४६) हे आधुनिक कवींच्या कवितांचे संपादन केलेले त्यांचे पहिले पुस्तक होय. या पुस्तकात त्यांनी केशवसुत, बालकवी, विनायक, गोविंदाग्रज, ना.वा. टिळक यांच्या काव्यांचा आढावा घेतला आहे. त्यांची ‘खर्डेघाशी’ (१९६३), ‘आकाशभाषिके’(१९६३), ‘शालजोडी’, ‘अमलान’(१९८३), ‘पंचम’(१९८४), ‘पाक्षिकी’(१९८६) ही लघुनिबंधांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. ‘शब्दयात्रा’(१९८६) हे साहित्यविषयक टिपणांचे आणि ‘भाषाविवेक’(१९९७) ही पुस्तकेही प्रकाशित आहेत.

अंतर्मुखता हे नव्या काव्याचे प्रमुख लक्षण असल्याचे सांगून काव्यातील ऐहिकता, निसर्गप्रेम आणि गूढवादाचा उलगडा त्यांनी आपल्या लेखनातून केला. राजाध्यक्ष यांच्या ललित लेखनात आंबोलीसारखे थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण, शामगढ हे आडवळणाचे रेल्वेस्थानक, शेवटची ट्राम ट्रेन आदी विषयही आढळतात. सत्यनिष्ठेवर पोसलेले त्यांचे लेखन हे बावनकशी सोन्यासारखे आहे. राजाध्यक्ष यांनी अनेक वर्षे ‘नॅशनल बुक ट्रस्ट’चे विश्वस्त म्हणूनही काम पाहिले. ज्ञानपीठ पुरस्कार समिती व साहित्य अकादमी (मराठी समिती) यांचेही ते काही काळ सदस्य होते. अशा या श्रेष्ठ लेखकाचे १९ एप्रिल २०१० रोजी निधन झाले.

First Published on: June 7, 2022 5:00 AM
Exit mobile version