BEST संप : मनसेने रोखले ‘कोस्टल रोड’चे काम, मेट्रोचे काम पुन्हा सुरु

BEST संप : मनसेने रोखले ‘कोस्टल रोड’चे काम, मेट्रोचे काम पुन्हा सुरु

गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्टच्या संपावर तोडगा निघाला नाही तर सोमवारी मुंबईमध्ये तमाशा करु, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला होता. त्यानुसार, आज मनसे रस्त्यावर उतरली असून त्यांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडलं आहे. वरळीमध्ये सुरु असलेल्या कोस्टल रोडच्या कामाला मनसेने विरोध दाखवला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडचं काम करणारे कर्मचारी आणि तेथील मशीन्स हलवल्याची माहिती मिळते आहे. याशिवाय कोस्टर रोडच्या कामासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या स्वरुपातील ऑफिसना देखील मनसेने टाळं ठोकलं आहे. ‘जोपर्यंत बेस्टचा संप मिटत नाही तोपर्यंत कोस्टल रोडचं काम सुरु होऊ देणार नाही’, अशी रोखठोक भूमिका मनसेकडून घेण्यात आली आहे.

संपाप्रकरणी चर्चा करण्यासाठी कृष्णकुंजवर जाऊन बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. कर्मचारी आणि त्यांच्या बायकांनी या भेटदरम्यान राज यांच्यापुढे आपले मुद्दे मांडले. यावेळी राज यांनी त्यांना एकजूटीने रहा असा सल्ला दिला होता. याशिवाय तुम्ही माझ्याकडे आलात म्हणजे तुमचा प्रश्न सुटणार, असा विश्वासही त्यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांना दिला होता. दरम्यान, बेस्ट संपावर तोडगा निघाला नाही तर मनसेही संपामध्ये उतरेल अशी घोषणा केलेल्या मनसैनिक आज थेट रस्त्यावर उतरले होते. मुंबईतील रस्त्यांवर जो काही तमाशा होईल त्यासाठी प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल, असा इशाराही मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावेळी दिला.

मेट्रोच्या कामालाही विरोध

बेस्ट संपाला पाठिंबा देण्यासाठी सक्रीय झालेल्या मनसेने कोस्टल रोडसोबतच मेट्रो रेलचे कामही रोखले. मुंबईतील गिरगाव येथे सुरु असलेले मेट्रो 3 चे काम मनसे कार्यकर्त्यांनी रोखले.

मेट्रोसाठी पैसे आहेत, कोस्टल रोडसाठी पैसे आहेत तर मग फक्त बेस्टसाठीच पैसे नाहीत का सरकारकडे? तेही मुंबईसाठी इतक्या वर्षांपासून सेवा पुरवत आहे. उच्च न्यायालयाने संप मागे घ्यायला सांगितलं. त्यामुळे उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या पगाराची, ग्रॅच्युइटी जबाबदारी घ्यावी.– संदीप देशपांडे, सरचिटणीस, मनसे

दरम्यान, गेल्या ६ दिवसांपासून सुरु असलेल्या बेस्टच्या संपामुळे मुंबईतील सामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेच. नियमीत बेस्टने प्रवास करणाऱ्या लाखो मुंबईकरांना वाहुतकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसंच या संपाचा गैरफायदा घेत टॅक्सी आणि रिक्षाचालक प्रवाशांची भरमसाट लूट करत आहेत.

First Published on: January 14, 2019 11:27 AM
Exit mobile version