मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला, मात्र शिवसेना – काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु

मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळला, मात्र शिवसेना – काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु

BMC

कोरोनाने अगोदरच त्रासलेल्या मुंबईकरांवर १४% – २५% मालमत्ता करवाढ लादण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत आला असता सदर प्रस्ताव सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवकांनी फेटाळून लावला आहे. मात्र मालमत्ता कर वाढीचा प्रस्ताव आम्ही केलेल्या विरोधामुळेच फेटाळला गेला आहे, असा दावा शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी केल्याने पालिकेत मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे दिसून आले.

मुंबईकर अगोदरच कोरोनामुळे हैराण झाले आहेत. त्यांच्या नोकऱ्या, रोजगार गेल्याने ते हवालदिल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर मालमत्ता करवाढ लादणे योग्य नाही, अशी प्रखर भूमिका घेऊन काँग्रेसने अगोदरच त्यास कडाडून विरोध केला होता. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवले होते. त्यामुळे मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव काँग्रेसने विरोध केल्यामुळेच फेटाळून लावण्यात आला आहे, असा दावा पालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

तर, मालमत्ता करवाढीच्या प्रस्तावाला शिवसेनेने अगोदरच विरोध केला होता. त्यानुसार आजच्या बैठकीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी, उपसूचना मांडून सदर प्रस्ताव फेटाळण्याची मागणी केली होती व त्यामुळेच हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. मुंबईत दर पाच वर्षांनी मालमत्ता करात काही प्रमाणात वाढ केली जाते. सन २०१५ मध्ये मालमत्ता कर वाढवण्यात आला होता. त्यानंतर २०२० मध्येही मालमत्ता करवाढ केली जाणार होती. मात्र कोरोनाच्या संकटामुळे करवाढीचा निर्णय पुढे ढकलण्यात आला.

कोरोनाच्या उपाययोजनांवर पालिकेने दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त निधी खर्ची झाला आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या उत्पन्नातही मोठी घट झाल्याने पालिकेने त्याच्या भरपाईसाठी मालमत्ता करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी आणण्यात आला होता. मात्र सभागृहनेत्या विशाखा राऊत यांनी उपसूचना मांडून प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची मागणी केली असता त्यास सर्वपक्षीय गटनेते पाठिंबा दिल्याने प्रस्ताव एकमताने फेटाळण्यात आला.


Maharashtra Corona Update: काळजी घ्या! राज्यातील कोरोना रुग्णसंख्या १० हजार पार, तर मृतांचा आकडाही वाढला


 

First Published on: June 23, 2021 9:31 PM
Exit mobile version