करोनामुळे मुंबईमध्ये बायोमेट्रिक बंदी

करोनामुळे मुंबईमध्ये बायोमेट्रिक बंदी

चीनमधील वुहान प्रांतातून जगभरात पसरत असलेल्या करोनो व्हायरसची दहशत आता भारतातही पसरू लागली आहे. दिल्लीमध्ये सरकारी कार्यालयातील बायोमेट्रिक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असताना आत मुंबईतीलही अनेक सरकारी कार्यालये, मुंबई विद्यापीठ व सीईटी सेलमध्ये या शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वाच्या विभागांमध्ये बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे, तर मुंबई महापालिका व रेल्वे कर्मचारी संघटनांकडूनही बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी केली आहे, तर मुंबईत शाळांमध्येही करोनाविरोधात जनजागृती करण्यात येत आहे.

करोना व्हायरसचे देशामध्ये 29 रुग्ण आढळल्यानंतर सर्वच स्तरावर भीतीचे वातावरण पसरले आहे. करोना व्हायरस हा संसर्गजन्य असल्याने विशेष काळजी घेण्यासंदर्भात सरकारकडून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. बायोमेट्रिक मशीनमध्ये बोटाने पंच करून हजेरी लावण्यात येते. त्यामुळे या मशीनमुळे करोना व्हायरस पसरू शकतो. ही बाब लक्षात घेऊन दिल्ली सरकारने तातडीची उपाययोजना म्हणून हजेरीसाठी महत्त्वाच्या असलेल्या बायोमेट्रिक मशीनवर बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबईतही सरकारी कार्यालयांमध्ये ‘बायोमेट्रिक बंदी’ लागू करण्यात आली आहे. राज्याच्या महावितरणने गुरुवारी बायोमेट्रिक मशीनवर बंदी घातली. राज्यातील शिक्षण क्षेत्रावरही या करोनाचे सावट दिसून येत आहे.
झपाट्याने पसरणार्‍या करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील सर्व विद्यापीठ व कॉलेजांना विशेष काळजी घेण्याच्या सूचना देणारे परिपत्रक काढले आहे.

देशातील अव्वल समजल्या जाणार्‍या मुंबई विद्यापीठानेही आपल्या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी बायोमेट्रिक बंदीचा निर्णय घेतला आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी) आयुक्त संदीप कदम यांनी ही कर्मचार्‍यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बायोमेट्रिक हजेरी बंद करण्याचा निर्णय घेत पुढील काही दिवस हजेरी नोंदवही ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासंदर्भात मुंबईतील विविध शाळांनी पुढाकार घेतला आहे. पालक व विद्यार्थ्यांमध्ये जागृकता निर्माण व्हावी यासाठी अंधेरीतील हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलने करोनासंदर्भातील फलक शाळेमध्ये लावले असल्याची माहिती शिक्षक उदय नरे यांनी दिली.

शिक्षण क्षेत्राप्रमाणे मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेनेही करोनाचा धसका घेतला आहे. लोकलमधून दररोज 75 लाख प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे मंडळाकडून उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. तसेच रेल मजदूर युनियनकडून कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी पश्चिम रेल्वेच्या विभागीय व्यस्थापक यांना पत्र लिहून बायोमेट्रिक मशीन बंद करण्याची मागणी केली आहे. याची दखल घेत रेल्वे मंडळाने 31 मार्चपर्यंत बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावण्यात येऊ नये असे आदेश काढले आहेत. मुंबई महापालिकेतील कर्मचार्‍यांच्या सुरक्षेसाठी मुंबई महापालिका कामगार कर्मचारी संघटनेकडूनही बायोमेट्रिक मशीनवर लावण्यात येणारी हजेरी तातडीने बंद करण्याची मागणी पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केली आहे.

First Published on: March 8, 2020 2:47 AM
Exit mobile version