मुंबईच्या किनारपट्टीवर ब्लू बटन जेली फिशचा वावर

मुंबईच्या किनारपट्टीवर ब्लू बटन जेली फिशचा वावर

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर सध्या ब्लू बटन जेली फिशचा वावर आढळून आला आहे. त्यामुळे, पर्यटकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. पाऊस येण्याआधी हे निळ्या फुलाप्रमाणे दिसणारे समुद्री जीव किनाऱ्यावर येतात. पावसाची पूर्व सुचना देणाऱ्या नैसर्गिक लक्षणांमधील ही एक सुचना असल्याचं कोळी बांधव सांगतात.

दरवर्षी पावसाळ्याआधी किनारपट्टीवर ब्लु बटन जेली आणि ब्लू बॉटल जेली फिश आढळतात. ज्याला कोळी बांधव समुद्रात फुल पडला असं म्हणतात. पावसाळ्याच्या आधी समुद्राकडून जमिनीकडे वेगाने वारे वाहतात. तेव्हा खोलात राहणारे हे जलचर प्राणी किनाऱ्यावर येतात. जेली फिशच्या अनेक वेगवेगळ्या प्रजाती आहेत. पण, इतर प्रजातींपेक्षा बॉटल जेली फिश अधिक घातक असते तर बटन जेली फिश तितकी त्रासदायक ठरत नसल्याचे समुद्रजीव अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितलं.

ब्लू बटन जेली घातक नाही

आठवडाभरापासून अक्सा बीच, गिरगाव चौपाटी अशा मुंबई लगतच्या चौपाट्यांवर बटन फिशचे दर्शन झाले. पण, ते घातकी नाहीत. त्यामुळे, मुंबईकरांना चिंता करण्याची गरज नसल्याचंही पाताडे यांनी सांगितलं. विषारी आणि घातक असलेल्या ब्लू बॉटल जेलिफिशने गेल्यावर्षी गणपती आणि दरम्यानच्या काळात चौपाटीवर फिरायला आलेल्या अनेक पर्यटकांना दंश केला होता. त्यामुळे, जेली फिश बाबतही लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण, सध्या दिसलेल्या बटन फिशला ब्लू बॉटल जेलीफिश समजून मुंबईकरांमध्ये गोंधळ उडू नये असेही जीवअभ्यासक म्हणतात.

वसंत ऋुतूच्या सुरूवातीला वावर

ब्लू बॉटल जेली फिश वसंत ऋुतूच्या मध्य किंवा उत्तरार्धात आढळतात. तर, बटन जेली फिश सुरुवातीला आढळतात. ब्लू बटन जेलीफिश चावल्यास तितकी भीती नाही वा त्याचा अधिक परिणाम होत नाही. पण, जर कोणाला अॅलर्जी असेल तर त्याला थोडा त्रास होऊ शकतो. त्यामुळे, सध्या पर्यटकांनी खबरदारी म्हणून समुद्र किनाऱ्यापासून थोडं दूरच राहावं, असाही सल्ला अभ्यासक देतात.

First Published on: June 12, 2019 10:17 AM
Exit mobile version