कृत्रिम तलाव निर्मितीकडे महापालिकेचे दुर्लक्ष; १२ वर्षांत फक्त १७ तलाव वाढले!

कृत्रिम तलाव निर्मितीकडे महापालिकेचे दुर्लक्ष; १२ वर्षांत फक्त १७ तलाव वाढले!

मुंबईमध्ये २००७ पासून गणेश मूर्तींचे विर्सजन पर्यावरण पूरक अर्थात कृत्रिम तलावांमध्ये करण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रारंभी १७ कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. परंतु १२ वर्षांनंतरही यामध्ये मोठी वाढ झालेली नसून २०१९मध्येही मागील वर्षांप्रमाणेच ३२ कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे दरवर्षी या कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ होत नाही. त्यामुळे ११ वर्षांनंतरही केवळ १५ कृत्रिम तलावांची भर पडलेली आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

प्रदूषण कमी कसं होणार?

गणरायाचे आगमन येत्या सोमवारी होत असून मंगळवारी दीड दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. गणरायांच्या आगमन मार्गाची योग्य प्रकारे देखरेख ठेवणार्‍या महापालिकेकडून विसर्जन स्थळांवर गणेशभक्तांसाठी विशेष सुविधा पुरवली जाते. शाडू मातीपासून बनवलेल्या इको फ्रेण्डली गणेश मूर्तींचा वापर कमी होऊन आता प्लास्टर ऑफ पॅरीसपासून बनवलेल्या मूर्तींचाच वापर अधिक होत असतो. त्यामुळे समुद्रात या मूर्तींचे विसर्जन केल्यामुळे पाणी प्रदूषित होते. त्यामुळे हे प्रदूषण कमी करण्यासाठी २००७मध्ये तत्कालीन महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी कृत्रिम तलावांची संकल्पना मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसार प्रारंभी १७ ठिकाणी कृत्रिम तलाव सुरू करण्यात आले. परंतु या तलावांना प्रतिसाद मिळत असतानाही कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ होताना दिसत नाही. मागील तीन वर्षांपासून कृत्रिम तलावांची संख्या ३२ एवढी करण्यात आली होती. तेव्हापासून ही संख्या कायम असून यंदाही मागील वर्षांएवढेच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे १२ वर्षांत कृत्रिम तलावांची संख्या केवळ १५ने वाढली आहे.

जनजागृतीत पालिका अपयशी

मागील वर्षी ३२ कृत्रिम तलावांमध्ये ८४३ सार्वजनिक आणि ३२ हजार ९५९ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते. तर गौरी मूर्तींसह एकूण ३४ हजार ५८४ गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करण्यात आले होते. मुंबईत एकूण २ लाख ३५ हजार ३७३ गणेशमूर्तींपैकी ३४ हजार ५८४ गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये होत असताना, कृत्रिम तलावांमध्ये हे विसर्जन करण्यासाठी मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात महापालिकेला अपयश येत आहे. ही संख्या वाढवण्याकडे महापालिकेचा कल दिसत नाही. महापालिकेच्या अधिकार्‍यांच्यामते, कृत्रिम तलावांची निर्मिती ही नगरसेवकांच्या मागणीनुसार केली जाते. त्यामुळे नगरसेवकांनी शिफारस केल्यास त्या ठिकाणी अशा प्रकारचे कृत्रिम तलाव बनवले जात असतात.

First Published on: August 31, 2019 8:52 PM
Exit mobile version