३ लाखांची लाच घेताना BMC अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ

३ लाखांची लाच घेताना BMC अधिकाऱ्याला पकडले रंगेहाथ

मुंबई महापालिकेच्या के /पूर्व विभाग कार्यालयात कार्यरत भाडे संकलक आणि त्यांच्या सहकाऱ्याला एका व्यक्तीकडून ३ लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले. त्यामुळे पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, पालिकेच्या के/ पूर्व विभागात राहणाऱ्या तक्रारदार व्यक्तीचे घराला लागून एक दुकान आहे. त्याचे घर पत्नीच्या नावाने आहे. तर दुकान मात्र तक्रारदाराच्या नावाने आहे. सन १९८५ मध्ये एसआरए प्राधिकरणाकडे रितसर शुल्क भरून ते दुकान तक्रारदाराने स्वतःच्या नावे कमर्शिअल करून घेतले होते.

त्यानंतर सदर तक्रारदाराने सन २०२० मध्ये मुंबई महापालिकामधून एनेक्चर-२ काढले. मात्र त्यामध्ये तक्रारदार व्यक्तीला त्याच्या दुकानाची नोंद झाल्याचे दिसून आले नाही. तसेच तक्रारदार यांची पत्नी यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या सागबाग स्नेहनगर एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेचे परिशिष्ट-२ मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी प्रकल्प अधिकारी (वसाहत) के / पूर्व, बीएमसी यांचे कार्यालयात अर्ज केला होता. सदर अर्जाच्या सुनावणीअंती तक्रारदार यांच्या पत्नी यांचे अपील हे अमान्य करण्यात आले होते. तसेच तक्रारदार यांनी दुकाना संदर्भात एसआरए योजनेत व्यवसायिक दुकानाची नोंद पूर्ववत करण्याकरिता दुकानाची कागदपत्रे जोडून ६/०१/२०२२ रोजी अंधेरी के/पूर्व विभाग, बीएमसी येथे अर्ज केला होता. मात्र पालिकेच्या के/ पूर्व विभागातील भाडे संकलक अधिकारी राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाबाबत ऑर्डर बदलून देण्यासाठी व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून पूर्ववत करण्यासाठी तक्रारदारांकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र सदर तक्रारदाराला त्या अधिकाऱ्याला लाच द्यायची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वरळी मुंबई येथे १८ फेब्रुवारी २०२२ रोजी लेखी तक्रार दिली.

२१ फेब्रुवारी २०२२ रोजी केलेल्या पडताळणीत राजेंद्र नाईक यांनी तक्रारदार यांना पत्नीच्या घरासंदर्भातील ऑर्डर बदलून देण्यासाठी आणि तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद पूर्ववत करण्यासाठी तक्रारदाराकडे ३ लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने ४ एप्रिल २०२२ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचून नाईक आणि त्यांचे सहकारी मोहन रावजी या दोघांना लाचेची ३ लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी सदर अधिकाऱ्यांनी, नाईक यांच्या कार्यालयाची झडती घेतली असता, लाचेच्या रक्कमेव्यतिरिक्त आणखी ३ लाख रुपये रोख रक्कम मिळून आल्याने ती रक्कम जप्त करण्यात आली आहे.


हेही वाचा – २,२१५ कोटींच्या बोगस बिलांसंदर्भात जीएसटी विभागाकडून सूत्रधारास अटक


 

First Published on: April 5, 2022 10:04 PM
Exit mobile version