रस्त्यावर आली होडी, अडली स्थानिकांची गाडी !

रस्त्यावर आली होडी, अडली स्थानिकांची गाडी !

महसूल विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेले सक्शन पंपाच्या होड्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत ठेवण्यात आल्या आहेत. मात्र नुकत्याच आलेल्या पुराच्या पाण्यात त्यापैकी एक होडी रस्त्यावर आल्याने कार्यालयाचा रस्ताच अडला आहे. महसूल विभाग मात्र याकडे लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिकांची गाडी अडली आहे.

दोन वर्षांपूर्वी खाडीपट्ट्यात सक्शन पंपाद्वारे होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खननावर कारवाई करण्यात आली होती. यामध्ये ३५ होड्या जप्त करण्यात आल्या. या मोठ्या होड्या ठेवायच्या कुठे, असा सवाल महसूल प्रशासनासमोर पडला होता. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाबाहेर असलेल्या मोकळ्या जागेत त्या ठेवण्यात आल्या. गेल्या दोन वर्षांपासून या होड्यांचा लिलाव अगर विल्हेवाट लावली गेली नसल्याने त्या तशाच पडून आहेत. यामुळे यामध्ये पुराचे आणि पावसाचे पाणीदेखील साचून राहिले आहे. या साचून राहिलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होऊन आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कार्यालयाबाहेर असलेल्या मुख्य रस्त्यावर अडकून पडलेली ही होडी हलविण्यासाठी क्रेनची गरज भासणार आहे. याबाबत महसूल विभागाला कळवूनही मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.कार्यालयात येणार्‍या नागरिकांची वाहने किंवा दुचाकींना येथून ये-जा करताना अडचण होत असल्याने रस्त्यावर आलेली ही होडी तात्काळ हटवली गेली पाहिजे, असे कार्यकारी अभियंता बी. एन. बहिर यांनी सांगितले.

First Published on: August 16, 2019 1:06 AM
Exit mobile version