अखेर पालिकेला सापडला बीएसयुपी घरकुल वाटपाचा मुहूर्त!

अखेर पालिकेला सापडला बीएसयुपी घरकुल वाटपाचा मुहूर्त!

अखेर बदलापुरातील बीएसयुपी योजनेच्या घरकुलांचे वाटप करण्याचा मुहूर्त नगर परिषद प्रशासनाला सापडला आहे. नगर परिषदेने पहिल्या टप्प्यात 54 लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करून घरकुलाच्या किल्ल्या त्यांच्याकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यामुळे गेल्या 13 वर्षांपासून हक्कांच्या घरांच्या प्रतिक्षेत हवालदिल झालेल्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी (ता.8) आमदार किसन कथोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या सभागृहात बीएसयुपी योजनेच्या लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले. आमदार किसन कथोरे तसेच नगराध्यक्ष प्रियेश जाधव, भाजपा गटनेते राजेंद्र घोरपडे, शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आदींच्या हस्ते लाभार्थ्यांना घरकुलाच्या किल्ल्या सुपूर्द करण्यात आल्या. कुळगाव बदलापूर नगर परिषद क्षेत्रात जेएनएनयूआरएम अंतर्गत बीएसयुपी योजनेला 2006 मध्ये मंजुरी देण्यात आली होती. परंतु 2009 पर्यंत या कामासाठी साधे सर्वेक्षणही पूर्ण झाले नव्हते.

प्रत्यक्ष कामाला 2010 मध्ये सुरुवात झाली होती. त्यामुळे काम सुरू होण्याआधीच चार वर्ष लांबणीवर पडलेली ही योजना लवकरात लवकर मार्गी लावून लाभार्थ्यांना घरकुलांचे वाटप व्हावी, अशी मागणी होत होती. मात्र, बीएसयुपी योजने अंतर्गत बदलापूर पूर्वेकडील म्हाडा तसेच सोनीवली येथे मिळून 904 घरकुले बांधून तयार असतानाही सुमारे तीन वर्ष पात्र लाभार्थींची यादी तयार करण्याचे काम रखडले होते. या पार्श्वभूमीवर भाजपा भटके विमुक्त आघाडीच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, तर राष्ट्रवादीने उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी नव्यानेच नगर परिषदेचा पदभार स्वीकारलेल्या मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांनी 31 डिसेम्बरपर्यंत पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते.

त्यांना ही डेडलाईन तंतोतंत पाळता आली नसली तरी त्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे कार्यवाहीला सुरुवात मात्र केली. 13 डिसेंबर 2018 रोजी कुळगाव बदलापूर नगर परिषदेने पात्र लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये 227 लाभार्थ्यांचा समावेश होता. दर दुसर्‍या यादीत 148 लाभार्थ्यांचा समावेश होता. त्यावर सूचना हरकती मागवून नगर परिषद सभागृहाची त्यास मंजुरी घेण्यात आली. सभागृहाच्या मंजुरीनंतरही घरकुल वाटप जवळपास 9 महिने लांबणीवर पडले. गेल्या महिन्यात या घरकुलांचे वाटप करण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, 26 व 27 जुलैच्या पुरामुळे घरकुल वाटपाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता, परंतु गुरुवारी मात्र पहिल्या टप्प्यातील घरकुल वाटप निर्विघ्नपणे पार पडले. या योजनेसाठी लाभार्थ्यांकडून मागासवर्गीयांना 10 टक्के व इतरांना 12 टक्के याप्रमाणे शुल्क आकारण्यात आले आहे. ज्यांनी ही रक्कम भरणा केली आहे, त्यांना घरकुलांचे वाटप करण्यात आले आहे.

First Published on: August 9, 2019 1:54 AM
Exit mobile version