ऑनलाईन शॉपिंग करणार्‍यांनो सावधान !

ऑनलाईन शॉपिंग करणार्‍यांनो सावधान !

Online Fraud

मुंबई:-ऑनलाइन शॉपिंग करताय. थांबा ! तुमची माहिती कोणी तरी चोरत आहे आणि त्याच माहितीच्या आधारावर तुमची आर्थिक फसवणूक केली जात आहे. अशा फसवणुकीचा प्रकार साकीनाका येथे राहणार्‍या एका तरुणीसोबत घडला आहे. साकिनाक्यात राहणार्‍या साजिदा मलिक या तरूणीने फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवरून भावासाठी मोबाईल फोन मागवला होता. त्यानंतर या तरुणीला फोन आला व फ्लिपकार्टमधून बोलत असल्याचे सांगून बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून तिच्याकडून हजारो रुपये उकळले. या प्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साकिनाका येथे राहाणारी साजिदा मलिक ही तरुणी एका कंपनीत ज्युनियर अकाऊंट म्हणून नोकरी आहे. तिने भावासाठी ’फ्लिपकार्ट’ ऑनलाइन शॉपिंगवर वेबसाईटवरून ११ ऑक्टोबर रोजी एक मोबाईल फोन मागवला होता. त्या नंतर काही वेळाने या तरुणीच्या मोबाईल फोनवर एका व्यक्तीने कॉल करून स्वतःचे नाव नितीन कुमार सिंग असे सांगितले. मी फ्लिपकार्टमधून बोलत आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून जे प्रोडक्ट ऑनलाईन खरेदी केले आहे.

त्याबदल्यात तुम्हाला टाटा सफारी गाडी बक्षीस लागली आहे, असे साजिदाला त्याने सांगितले. परंतु तिला त्याच्यावर विश्वास बसला नाही म्हणून तिने त्याची उलट तपासणी केली असता त्याने साजिदाने केलेल्या ऑनलाइन शॉपिंगची माहिती सांगितली आणि त्याचवेळी तिच्या मोबाईल फोनवर फ्लिपकार्टवरून बक्षीस लागल्याचा संदेश देखील आला. तिचा विश्वास बसावा म्हणून फोन करणार्‍या नितीन सिंग नावाच्या व्यक्तीने तिच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर त्याचे स्वतःचे आधार कार्ड, पॅनकार्ड, फ्लिपकार्टचा कर्मचारी आय.डी. पाठविला.हा सर्व पुरावा पाहिल्यानंतर साजिदाने त्याच्यावर विश्वास ठेवला.

त्यावेळी सिंग या व्यक्तीने तिला तुम्हाला बक्षीस म्हणून टाटा सफारी गाडी लागली असून तुम्ही गाडी घेऊ शकता किंवा त्याच्या बदल्यात तुम्ही गाडीची किंमत 12,50,148/- रूपये मिळवू शकता. मात्र त्याकरिता तुम्हाला रजिस्ट्रेशन चार्जेस, जीएसटी भरावे लागतील. पैसे भरण्यासाठी त्याने बिलोद सनदिल या व्यक्तीच्या बँक खात्याचा क्रमांक पाठवला. साजिदा हिने नितीन सिंग या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे बँक खात्यात तीन टप्प्यांत 48 हजार रुपयांची रक्कम पाठवली. पैसे भरल्यानंतर तिने बक्षिसाची रक्कम त्याच्याकडे मागितली असता त्याने पुन्हा 5 हजार रुपये भरण्यास सांगितले.

मात्र तिला संशय आल्यामुळे तसेच आपली फसवणूक झाल्याचे समजताच साजिदाने साकिनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या प्रकरणी साकिनाका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून फ्लिपकार्ट कंपनीला पत्रव्यवहार करण्यात आलेला असल्याची माहिती व.पो.नि किशोर सावंत यांनी दिली. तसेच फसवणारी व्यक्ती ही राज्य बाहेरील असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे सावंत यांनी सांगितले.

First Published on: October 17, 2018 12:59 AM
Exit mobile version