परमबीर सिंह यांना आयोगाकडून शेवटची संधी, पाचवे समन्स बजावले

परमबीर सिंह यांना आयोगाकडून शेवटची संधी, पाचवे समन्स बजावले

१०० कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना न्या.चांदीवाला आयोगाकडून शेवटची संधी देण्यात आली आहे. आयोगाने त्यांना ६ ऑक्टोबर रोजी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश नुकत्याच काढण्यात आलेल्या समन्सद्वारे दिले आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचे वकील अनिता शेखर यांनी परमबीर सिंह यांची संपत्ती आयोगाने ताब्यात घेण्यात यावी अशी मागणी आयोगापुढे केली आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी वसुलीच्या आरोपाप्रकरणी राज्य शासनाने सेवानिवृत्त न्या. चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा, असे शासनाकडून सांगण्यात आले होते. दरम्यान या समितीने चौकशी सुरू करून परमबीर सिंह यांना आयोगासमोर हजर राहण्यासाठी चार समन्स पाठवून देखील सिंह हे चौकशीला उपस्थित राहिले नाही.

आयोगाने परमबीर सिंह यांच्याविरुद्ध जामीनपात्र अटक वॉरंट मागील आठवड्यात काढले होते, हे वॉरंट बजावण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी यांना नेमण्यात आले होते, हे अधिकारी हे वॉरंट घेऊन परमबीर सिंह यांच्या मुंबईतील राहत्या घरी तसेच चंदीगड या ठिकाणी जाऊन आले. मात्र, परमबीर सिंह मिळून आले नाही.

अखेर न्या.चांदीवाल आयोगाने परमबीर सिंह यांना शेवटची संधी म्हणून पाचवे समन्स बजावले आहे. या समन्सद्वारे परमबीर सिंह यांना आयोगासमोर ६ ऑक्टोबर रोजी उपस्थित राहावे लागणार आहे. यावेळी अनिल देशमुख यांच्या वकील अनिता शेखर यांनी आयोगापुढे अशी मागणी केली आहे की, परमबीर सिंह यांना वारंवार समन्स बजावून देखील ते उपस्थित राहत नसतील तर आयोगाने त्यांची राज्यातील संपत्ती ताब्यात घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अकोला पोलीस विभागातील पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्या विरोधात केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारीत राज्य शासनाने ओपन इन्कवारी करण्याची परवानगी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली आहे. परमबीर सिंह यांच्या विरुद्ध यापूर्वी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अनिल डांगे प्रकरणात ओपन इन्कवारी सुरू आहे.

First Published on: September 22, 2021 11:41 PM
Exit mobile version