बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक

बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीचे आमिष दाखवून फसवणूक

आमिष दाखवून फसवणूक

बंदी असलेल्या औषधांच्या विक्रीचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणार्‍या नऊ आरोपींना गुरुवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. अंधेरीतील एका कॉल सेंटरमध्ये छापा टाकून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अ‍ॅल्वीस पिटर न्यूनेस, मोहम्मद इरफान मदार शेख, अब्दुल हमीद शेख, योगेश सुरेश जाधव, रोहित राजेंद्रसिंग मेनराल, मेहुल जयंतीलाल रानबेरीया, मोरीस रॉलंड हंटर, निखील साव्या देवल, जयविंरदर गुरविंदर सिंग अशी या नऊ अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना येथील स्थानिक न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीतील एक कॉल सेंटर सुरू असून या कॉल सेंटरमध्ये अमेरिकन नागरिकांना भारतासह अमेरिकेत बंदी असलेल्या औषधांची विक्रीचे आमिष दाखवून फसविले जात आहे अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी गुरुवारी रात्री गुन्हे शाखेच्या एका विशेष पथकाने अंधेरीतील मरोळ-मरोशी रोडवरील नंदधाम इंडस्ट्रियल इस्टेटच्या मी टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत छापा टाकला होता.

अशी केली जात होती फसवणूक

पोलिसांना तिथे कॉल सेंटर सुरू असून अमेरिकन नागरिकांना कॉल करून ते स्वत: अमेरिकन नागरिक असल्याची बतावणी केली जात होती. त्यानंतर त्यांना बंदी असलेल्या वायग्रा, सिआलिससह इतर औषधांचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून विविध बँक खात्यात अमेरिकन चलन जमा करण्यास सांगितले जात होते. हा प्रकार उघडकीस येताच कॉल सेंटरचा मालक आणि चालक अ‍ॅल्विस न्यूनेस याच्यासह इतर आठ सेल्स प्रतिनिधींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. या सर्वांविरुद्ध फसवणुकीसह अन्य भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना पोलिसांनी अटक केली. घटनास्थळाहून पोलिसांना काही अमेरिकन नागरिकांची नावे आणि त्यांचा राहण्याचा पत्ता सापडला आहे. चौकशीत अ‍ॅल्विस याने भागीदारीत हे कॉल सेंटर सुरू केले होते. 4 जून 2016 ते 4 जून 2019 या कालावधीत त्याने ही जागा भाडेतत्त्वावर घेतली होती. अटकेनंतर या सर्वांना शुक्रवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी या सर्व आरोपींना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: December 15, 2018 4:53 AM
Exit mobile version