Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

Corona Vaccination: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस

देशभरात कोरोनाचं थैमान सुरू असून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोनाची परिस्थिती अधिक चिंताजनक झाल्याचे दिसतेय. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजधानी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील लसीकरण मोहीमेच्या तिसऱ्या टप्प्यात आज गुरूवारी कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस घेतला. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील जे.जे. रुग्णालयात कोरोना लस घेतली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी देखील कोरोनाची लस घेतली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील कोव्हिशील्ड या कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला असल्याची माहिती डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे पाहायला मिळत असून एका दिवसाला ५० हजारांहून अधिकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने कोरोनाची भिती जास्तच वाढत आहे. बुधवारी राज्यात ५९ हजार ९०७ नवीन कोरोना बाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील बाधितांचा आकडा वाढून तो ३१ लाख ७३ हजार २६१ झाली असून राज्यात ५ लाख १ हजार ५५९ रूग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहे. यासह वाढत्या बाधितांच्या आकडेवारीसह कोरोनाने बळी जाणाऱ्यांचा आकडा देखील चिंताजनक असल्याचे समोर आले आहे. बुधवारी राज्यात ३२२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात ५६ हजारांहून अधिकांचा मृत्यू हा कोरोनामुळे झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.७९ टक्के इतका झाला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसींचा तुटवडा सर्वाधिक जाणवत आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, विदर्भातील अमरावती, वर्धा, बुलढाणा, गोंदिया या ठिकाणी कोरोना लसीकरणाचा तुटवडा निर्माण झाल्याचे समोर आले तर काही ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्रच बंद झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असून केंद्राने लवकरात लवकर कोरोनाची लस पुरवावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.


 

First Published on: April 8, 2021 12:32 PM
Exit mobile version