ठाण्यात भरदिवसा तरुणीची निर्घृण हत्या

ठाण्यात भरदिवसा तरुणीची निर्घृण हत्या

चाकू हल्ला

ठाण्यातील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळील नितीन जक्शन येथे एका २० वर्षीय कॉलेज तरुणीची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्राची विकास झाडे असे या तरुणीचे नाव असून तिच्यावर अज्ञाताकडून चाकू हल्ला झाल्याची खळबळजनक घटना आज (शनिवारी) सकाळी घडली. या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाला होता. मात्र काही वेळातच ठाणे पोलीसांनी त्याचा शोध लावत त्याला अटक केली.

प्रेमप्रकरणातून हल्ला

प्राचीला या आरोपीने जून महिन्यात बेदम मारहाण केल्याची तसेच धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतची तक्रार तिने पोलीस ठाण्यात केली होती. त्याचवेळी पोलीसांनी या तरुणावर कठोर कारवाई केली असती तर आज प्राचीवर जीव गमावण्याची वेळच आली नसती, असे तिच्या नातलगांचे म्हणणे आहे. कोपरी कॉलनीतील किशोर नगर परिसरात राहणारी प्राची ठाण्यातील बेडेकर कॉलेजमध्ये बीकॉमचे शिक्षण घेत होती. सोबतच प्राची नोकरीदेखील करत होती.

दुचाकीवरून जाताना केला हल्ला

आज सकाळी प्राची तिच्या दुचाकीवरून ऑफिसला जात असताना ईस्टर्न एक्सप्रेसवर आकाश पवार (वय २५) या तरुणाने तिच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर तो तिथून पळून गेला. तेशील लोकांनी आरोपील पकडण्याचा प्रयत्नही केला. मात्र आरोपी त्यांच्या तावडीतून निसटला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्राचीला तेथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

काय आहे नेमकं प्रकरण

प्राची आणि आकाश हे दोघेही एकमेकांना गेल्या तीन वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समजते. मात्र, काही कारणास्तव दोघांमध्ये अंतर आले, अशी माहिती समोर येत आहे.

First Published on: August 4, 2018 4:48 PM
Exit mobile version