मुंबईत 22 हजार ७७४ शौचकुपांंचे बांधकाम

मुंबईत 22 हजार ७७४ शौचकुपांंचे बांधकाम

शौचालय

मुंबईत आणखी 22 हजार सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. एकूण 23 भागांमध्ये विभागून या शौचालयांचे बांधकाम होणार आहे. यासाठी 14 कंत्राटदारांची निवड झाली आहे. याकरता 553 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. टप्पा दहामधील निम्म्या शौचकुपांचे बांधकाम अजूनही पूर्ण झालेले नाही. त्यातच शौचालये उभारण्यासाठी नवीन कंत्राटदार नेमले आहेत, त्यामुळे ते ही कामे पूर्ण करतील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईतील सर्व विभागांमध्ये आर.सी.सी शौचालयांचे नियोजन, संकल्पचित्रे व बांधकाम करणे तसेच या शौचालयांचे मलकुंड साफ करण्यासाठी टप्पा 11 अंतर्गत महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. तळ मजला तसेच दोन मजल्यांचे बांधकाम २३ भागांमध्ये विभागून शौचालयांचे बांधकाम होणार आहे. यामध्ये अंदाजित खर्चाच्या तुलनेत 18 ते 25 टक्के अधिक दराने बोली लावत कंत्राटदाराने कंत्राटे मिळवली आहेत.

या कंत्राटात विधी एंटरप्रायझेस, एपीआय सिव्हीलकॉन प्रा.लि, व्हीएनसी इन्फ्राप्रोजेक्ट या कंपन्यांना प्रत्येकी तीन भागांची कामे तर एम.एम. कन्स्ट्क्शन, एसी कार्पोरेशन आणि डी.बी.इन्फ्राटेक या कंपन्यांना प्रत्येकी दोन भागांची कामे मिळाली आहेत. उर्वरीत आठ भागांसाठी स्वतंत्र कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे.

महापालिकेच्यावतीने १९९७मध्ये जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यातून वस्ती स्वच्छता कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत सध्या टप्पा दहाचे काम सुरु आहे. या अंतर्गत २६ नोव्हेंबर २०१८ पर्यंत एकूण 5 हजार 170 शौचकुपांपैकी 2 हजार 819 शौचकुपांची कामे पूर्ण झाली आहेत. तर काही शौचकुपांची कामे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे १ हजार ५८५ शौचकुपांची कामे प्रगतीपथावर असल्याचे घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे. टप्पा ११ अंतर्गत आता एकूण २२ हजार ७७४ शौचकुपे बांधण्यात येत असून यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त विश्वास शंकरवार यांनी स्पष्ट केले.

मुंबईतील २४ विभागांमधील सामुदायिक शौचालयांची संरचनात्मक लेखापरिक्षण विभाग कार्यालयामार्फत करण्यात आले आहे. त्यातील बहुतांशी शौचालये हे अतिधोकादायक अवस्थेत आहेत. त्यामुळे जुनी शौचालये पाडून त्याजागी नव्याने सामुदायिक शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. नव्याने बांधण्यात येणार्‍या शौचालयांच्या पाच वर्षांच्या देखभालीची जबाबदारी ही संबंधित कंत्राटदाराची राहणार आहे. तसेच दर तीन महिन्यांनी शौचालयाच्या मलकुंडाची सफाई करणे बंधनकारक आहे. तीन वर्षे मलकुंडांची सफाई करणे कंत्राटदाराला बंधनकारक असेल,असेही त्यांनी स्पष्ट केले.

टप्पा दहामध्ये बांधण्यात येणारी शौचकुपे : 5,170
आतापर्यंत बांधकाम झालेली शौचकुपे : 2,819
टप्पा ११मध्ये बांधण्यात येणारी शौचकुपे: २२,७७४

First Published on: December 20, 2018 4:22 AM
Exit mobile version