कोरोना अलर्ट! मुंबईत गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा होणार जारी

कोरोना अलर्ट! मुंबईत गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा होणार जारी

देशातील विविध राज्यांमध्ये कोविड-१९ विषाणू संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून मुंबईत देखील मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व पालिका रुग्णालये आणि खासगी रुग्णालयांनी देखील कोविड उपचारांसाठी सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये सर्व कर्मचारी, रूग्ण तसंच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क सक्तीचे करण्याचे निर्देश पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिले.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी आज सोमवारी तातडीची आढावा बैठक घेतली. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने कोविड रूग्णसंख्या वाढीबाबतचा वर्तवलेला अंदाज पाहता संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहण्याचा सल्ला सरकारने दिला आहे. वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवणे आवश्यक आहे, असे सांगून आयुक्तांनी विविध सूचना याप्रसंगी केल्या.

औषध इत्यादी खरेदी- महानगरपालिकेच्या मध्यवर्ती खरेदी खात्याने महानगरपालिकेची सर्व रुग्णालये मिळून आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करण्याबाबतच्या सूचना यावेळी आयुक्तांनी दिल्या. तसंच कोणत्याही बाबीचा तुटवडा भासणार नाही, याची खातरजमा करण्यात यावी, असंही यावेळी आयुक्तांनी सांगितले. कोविड संसर्ग बाधित रूग्ण वेळीच शोधून काढले तर संसर्गाला अटकाव करता येतो, त्यामुळे कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, परिणामी उपचार करणे सोपे जाते. चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी लवकरात लवकर बैठक घ्यावी, असे आदेशही यावेळी देण्यात आले.

तसंच कोविड रुग्णसंख्या वाढल्यास अतिदक्षता उपचारांची आवश्यकता वाढू शकते. हे लक्षात घेवून सर्व रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले ऑक्सिजन प्लांट सुस्थितीत कार्यरत आहेत का? ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे का? या सर्व बाबींचे परीक्षण करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.कोविडच्या यापूर्वीच्या लाटांमध्ये रूग्ण व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घेऊन कोणत्याही प्रकारच्या स्थितीचा सामना करण्यासाठी आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणेसह ते कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्याबाबतही या बैठकीत सांगण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रूग्णालयांमधील सर्व कर्मचारी, रुग्ण तसेच अभ्यागतांना देखील मास्क लावणे हे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सक्तीचे करण्यात येत आहे. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात येणार आहे. मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोविड पूर्वसज्जतेचा भाग म्हणून मॉक ड्रिल करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले. जर रुग्ण कोविड बाधित आढळला आणि त्याच्यावरील शस्त्रक्रिया आपत्कालीन स्वरुपाची नसेल तर ती शस्त्रक्रिया पुढे ढकलावी, असंही सांगण्यात आलं आहे.

कोविड बाधित तसेच लक्षणं विरहीत रुग्ण लक्षात घेता, आरोग्य खात्याने कोविड रूग्णांच्या गृह विलगीकरण संदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना हे देखील उपस्थित होते. तसंच अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

First Published on: April 10, 2023 6:40 PM
Exit mobile version