कुष्ठरोगी, ज्येष्ठ नागरिकांच्या शिधेवर डल्ला

कुष्ठरोगी, ज्येष्ठ नागरिकांच्या शिधेवर डल्ला

कुष्ठरोगाने ग्रासलेले तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींचा फायदा घेत त्यांच्या हिश्शाचे धान्य लाटण्याचा प्रकार नुकताच अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून उघडकीस आला आहे. या दोन्ही लाभार्थ्यांच्या बोटाचे ठसे बायोमेट्रिक मशीनसाठी उमटत नसल्याचा गैरफायदा शिधा केंद्र चालकाने घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे असे प्रकार करणार्‍या शिधा वाटप केंद्राचा परवानाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बायोमेट्रिक मशीन राज्यातील प्रत्येक शिधा वाटप केंद्रात देण्यात आले आहे. पण बायोमेट्रिकच्या अडचणी येत असलेल्या ठिकाणी संबंधित अधिकार्‍यांना लॉग इन पासवर्डच्या माध्यमातून अशा गरजू लोकांसाठी धान्य वितरणासाठी पॉज मशीनचा एक्सेस आहे. पण याचा गैरफायदा शिधा केंद्र चालकांकडून घेण्यात आल्याचे प्रकार ठाण्यातील तीन शिधावाटप केंद्रांवर घडले आहेत. अधिकार्‍यांचे लॉग इन आणि पासवर्ड मिळवून याठिकाणी ज्येष्ठ नागरिक तसेच कुष्ठरोगग्रस्त नागरिकांचे धान्य हडपण्याचे प्रकार समोर आले आहेत. या तिनही शिधा केंद्र चालकांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. ठाणे येथील एक दुकान तर उल्हासनगर येथील दोन दुकानांचा यामध्ये समावेश आहे. मुलुंड येथील दुकानात तांदूळ आणि गव्हाचा कोटा वापरून १ लाख ३० हजाराचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले आहे. तर उल्हासनगर येथे २ दुकानांमध्ये तांदूळ, गहू आणि केरोसिन याचा भ्रष्टाचार झाला आहे.

एकूण ५० हजार रूपयांचा भ्रष्टाचार या प्रकरणात झाला आहे. भांडुप आणि घाटकोपर या दोन्ही ठिकाणीही विभागाने सातत्याने निरीक्षण ठेवले आहे. त्यामुळे याठिकाणीही असे प्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे. तीनही प्रकरणांमध्ये नेहमीपेक्षा जास्त धान्याचा कोटा वापरण्यात आल्यानेच ऑनलाईन यंत्रणेत हा भ्रष्टाचार उघडकीस आला. फ्लाईंग स्क्वॉडने या तिनही ठिकाणी अचानक धाडी घातल्यानेच हे प्रकार उघडकीस आले आहेत.

First Published on: July 11, 2019 5:10 AM
Exit mobile version