शिक्षणाच्या साहित्यासाठी भंगारातल्या पेट्या

शिक्षणाच्या साहित्यासाठी भंगारातल्या पेट्या

ठाणे जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागातील आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तू ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या सरकारी पत्र्याच्या पेट्या गेली कित्येक वर्ष जुन्याच असल्याने या पेट्यांना गंज चढून त्या जीर्ण झाल्या आहेत. या पेट्यांची झाकणे तुटली आहेत. गंज पकडल्याने ठिकठिकाणी पत्रा फाटला आहे. पेट्यांची झाकणे उघडताना हाताला गंजलेला पत्रा लागून विद्यार्थ्यांना दुखापत होण्याची भीती आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि विकास योजनांसाठी सरकारकडून कोट्यवधींचा खर्च केला जात असताना विद्यार्थ्यांना जुन्याच पेट्या वापरण्याची वेळ आली आहे.

शहापूर तालुक्यातील बहुतांश आदिवासी आश्रमशाळांत हे वास्तव पहावयास मिळत आहे. कित्येक आश्रमशाळांची दैन्यावस्था असताना गंजलेल्या जुन्याच शालेय पेट्या विद्यार्थ्यांना वापराव्या लागत असल्याचे चित्र आश्रमशाळांमध्ये आहे.
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या, पुस्तके, पेन आदी शालेय साहित्य ठेवण्यासाठी सरकारकडून पत्र्यांच्या पेट्या दिल्या जातात. मात्र, कित्येक वर्षांपासून अशा पेट्या आश्रमशाळांना पुरवण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळेच जुन्याच पेट्यांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय साहित्य ठेवावे लागत आहे. या जुन्या पेट्या जीर्ण झाल्या आहेत. कड्या तुटल्या आहेत. पत्रे फाटले आहेत.

First Published on: October 10, 2019 2:40 AM
Exit mobile version