डेबिट कार्ड क्लोनिंगने ६० जणांना फसविले

डेबिट कार्ड क्लोनिंगने ६० जणांना फसविले

दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील बँक खातेदारांच्या डेबिट कार्डचे क्लोनिंग करून त्या माध्यमातून मुंबई तसेच गुजरातमधून रोख रक्कम काढणार्‍या रुमानिया देशाच्या एका नागरिकाला विक्रोळी पार्क साईड पोलिसांनी अटक केली. या परदेशी नागरिकांकडे पोलिसांना विविध बँकांचे क्लोन केलेले सुमारे ६० डेबिट कार्ड्स आणि पावणे चार लाख रुपयांची रोकड हस्तगत केली. मुंबई तसेच जवळपासच्या शहरात त्याचे काही साथीदार असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

करायवन मरियन (४९) असे अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकाचे नाव आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा विक्रोळी पश्चिम लालबहादूर शास्त्री मार्गावरील टी जंक्शन या ठिकाणी असलेल्या एका बँकेच्या एटीएम सेन्टरमध्ये एक परदेशी नागरिक चेहर्‍यावर मास्क लावून रोकड काढण्याचा प्रयत्न करीत होता. त्याची हालचाल संशयास्पद वाटल्यामुळे विक्रोळी पार्क साईड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने त्याला हटकले. पोलिसांना बघून परदेशी नागरिकाने पळण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे विविध राष्ट्रीयकृत बँकांची तब्बल ६० डेबिट कार्ड्स मिळाली. तसेच त्याच्याकडे ३ लाख ७०हजार रुपयांची रोकड मिळून आली. अधिक चौकशीत त्याच्याकडे मिळून आलेले डेबिट कार्ड हे वेगवेगळ्या भारतीय नागरिकांच्या नावाचे असल्याचे उघडकीस आले.

पार्क साईड पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याकडे कसून चौकशी केली असता सर्व डेबिट कार्ड्ेस ही क्लोनिंग केलेली असून सर्व कार्ड्स उत्तर प्रदेशातील बँक खातेदारांची असल्याचे समजले. अटक करण्यात आलेला करायवन मरियन सहा महिन्यांपूर्वी पर्यटन व्हिसावर भारतात आला. प्रथम तो दिल्लीत आला. तेथून तो उत्तर प्रदेशात गेला होता. त्या ठिकाणी त्याने क्लोनिंग केलेले डेबिट कार्ड ताब्यात घेऊन गुजरातमध्ये काही आठवडे काढून तो मुंबईत आला होता. पंचतारांकित हॉटेलमध्ये राहून त्याने मुंबईतील अनेक ठिकाणी क्लोनिंग केलेल्या डेबिड कार्डचा वापर करून वेगवेगळ्या एटीएम सेन्टरमधून रोकड काढली. महत्वाचे म्हणजे मरियन हा रात्रीच्या सुमारास एटीएममध्ये जाऊन कॅमेरात चेहरा येऊ नये म्हणून चेहर्‍यावर रुमाल,मास्क लावून रोकड काढत असे.

दोन दिवसानी जागा आणि हॉटेल बदलायचा
मरियम हा मुंबईतील हॉटेलमध्ये दोन दिवसांपेक्षा जास्त थांबत नव्हता. दोन दिवसांनी तो जागा आणि हॉटेल बदलत होता. त्याने दक्षिण मुंबई, पश्चिम उपनगर,तसेच पूर्व उपनगरातील अनेक ठिकाणी एटीएममधून रोकड काढल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

स्कीमरच्या सहाय्याने डेटा मिळवला
क्लोनिंग केलेली सर्व कार्ड्स दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील असून त्या ठिकाणी एटीएम सेंटरमध्ये स्कीमर बसवून संपूर्ण कार्डचा तपशील मिळवून तसेच बटन कॅमेराच्या मदतीने कार्डचा पिनकोड मिळवत असे. त्यानंतर कार्ड क्लोन करून त्याचा वापर त्या राज्याच्या बाहेर करत असे.

दोन तासात ५ लाखाचे टार्गेट
मरियन हा शहराच्या विविध ठिकाणी असलेले तसेच ज्या ठिकाणी वर्दळ नाही अशा एटीएममधून रोकड काढत होता. त्याच्याजवळ मिळालेल्या प्रत्येक डेबिट कार्डचा वापर करून वेगवेगळ्या एटीएम सेंटरमधून प्रत्येक दोन तासात ५ लाख रुपयांपर्यंत रोकड काढत होता. दोन तासात तेवढी रोकड काढण्याचे त्याचे टार्गेट असायचे. मात्र त्याला पोलिसांनी अटक केली त्या वेळी ३ लाख ७० हजार रुपयांची रोकड काढली होती.

क्लोन केलेली आणखी कार्ड्स आणि रोकड मिळण्याची शक्यता
मरियनला विक्रोळीमधून अटक केल्यानंतर तो सध्या कुठे राहण्यास होता हे अद्याप पोलिसांना कळू शकलेले नाही. तो हिरानंदानी संकुल या ठिकाणी राहत असण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत, मात्र मरियम हा तपासात सहकार्य करीत नसल्यामुळे त्याचे सध्याचे राहण्याचे ठिकाण पोलिसांना कळू शकलेले नाही. त्याचे राहण्याचे ठिकाण मिळाल्यास ज्या ठिकाणी तो राहत होता त्या ठिकाणी क्लोन केलेली आणखी डेबिड कार्ड आणि रोकड मिळण्याची शक्यता आहे. मरीयम हा या पूर्वी २०१५ मध्ये मुंबईत येऊन गेला होता, अशी माहिती चौकशीत समोर आली आहे.

First Published on: November 15, 2018 5:18 AM
Exit mobile version