हिमालय पुलाच्या लोकार्पणापूर्वीच विद्रुपीकरण

हिमालय पुलाच्या लोकार्पणापूर्वीच विद्रुपीकरण

मुंबई : मुंबई महापालिकेने सात कोटी रुपये खर्चून सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणाऱ्या हिमालय पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या पुलाचे लोकार्पण होणार आहे. मात्र तत्पूर्वीच या पुलाच्या पिलरला जाहिरात पोस्टर, हरवलेल्या व्यक्तींचे फोटोसह पोस्टर लावून विद्रुपीकरणाला सुरुवात झाली आहे. परिणामी आता पालिका यंत्रणेला पोस्टर काढायचे काम हाती घ्यावे लागले आहे. (Defacement of the Himalaya Bridge even before its inauguration)

मुंबईत अनेक ठिकाणी पादचारी, वाहतूक पूल, स्काय वॉक वगैरे आहेत. ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूक सुरळीत होते व पादचारी यांनाही रस्त्यावरून जीवघेणे चालणे करण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करणे सुलभ व सुरक्षित झाले आहे. मात्र मुंबईत काही पूल, उड्डाणपूल हे अनेक वर्षे जुने व धोकादायक स्थितीत आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहेत. तर काही पुलाचे काम हाती घेणे बाकी आहे.

हिमालय सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणाऱ्या हिमालय पुलाचा मोठा भाग १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये जिवीत हानीही झाली होती. त्यामुळे पलिकेने सदर पूल पूर्णपणे पाडून त्या पुलाची तब्बल सात कोटी रुपये खर्चून नव्याने पुनर्बांधणी केली. सध्या या पुलाचे पिलर, जिना, स्लॅब, लादीकरण, संरक्षक स्टील ग्रील आदी कामे पूर्ण झाली आहेत.

आता या पुलाला लवकरच सरकता जिना बसविण्यात येणार आहे. मात्र तत्पूर्वी पुलाचे काम पूर्ण झाल्याने पादचाऱ्यांसाठी हा पूल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळ दिल्यास त्यानुसार, सदर पुलाचे लोकार्पण एप्रिल महिन्यातच प्रारंभी करण्यात येणार आहे. मात्र या पुलाचे लोकार्पण होण्यापूर्वीच सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या हार्बर लाईनच्या फलाट क्रमांक एकला लागून असलेल्या पुलाच्या खालील आधारभूत पिलरला दोन ठिकाणी पोस्टर चिटकविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्यापैकी एक पोस्टर पालिका कर्मचारी यांनी व कामगारांनी फाडून काढून टाकला आहे. तर दुसरा पोस्टर हा एका हरवलेल्या मुलाबाबतचा आहे. मात्र तो अद्याप हटविण्यात आलेला नाही. या पोस्टरबाजीमुळे पुलाचे लोकार्पण करण्यापूर्वीच विद्रुपीकरण झाले आहे. त्यामुळे जेव्हा मुख्यमंत्री शिंदे महोदय पुलाचे लोकार्पण करण्यासाठी येतील त्यागोदरच सदर पोस्टर काढून भिंतीला पुन्हा रंगरंगोटी करावी लागणार आहे. मात्र तोपर्यंत पालिका व कंत्राटदार यांच्या कामगारांना पुलाच्या भिंतीला, पिलरला पुन्हा कोणी पोस्टर लावून विद्रुप करणार नाही, याची विषेश काळजी घ्यावी लागणार आहे.


हेही वाचा – देश तुमच्या *** माल आहे का? निलेश राणेंची राहुल गांधींवर टीका

First Published on: March 28, 2023 7:30 PM
Exit mobile version