डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली

डेंग्यूचा डास

पावसाळा सुरू झाला की, साथीच्या आजारांच्या रुग्णांची संख्या वाढते. लेप्टोनंतर आता डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचं आढळून आलं आहे. ऑगस्ट महिन्याच्या पंधरावड्यात जुलै आणि जून महिन्याच्या तुलनेत रुग्णांची संख्या वाढली असल्याचं समोर आलं आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्यात १५ दिवसामंध्ये एकूण ७९ रुग्ण आढळले आहे.

ऑगस्ट महिन्याच्या पंधरावड्यात आढळले ७९ रुग्ण

महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, जुलै महिन्यामध्ये डेंग्यूचे ६० रुग्णांचं निदान झालं होतं आणि जून महिन्यात एकूण २१ रुग्ण आढळले होते. पण, ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवड्यांमध्ये डेंग्यूच्या केसेस वाढल्या असून आतापर्यंत ७९ रुग्ण आढळले आहेत. तर, या वर्षी पावसाळ्यात आतापर्यंत शहरात डेंग्यूचे १६० रुग्ण आढळून आले आहेत. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या अहवालानुसार, ऑगस्ट महिन्याच्या दोन आठवड्यात १ हजार १८३ डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांना शहराच्या वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २०१८ च्या जुलै महिन्यात ९९५ डेंग्यूच्या संशयित रुग्ण आढळले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये, डेंग्यू ची लक्षणे आढळलेल्या जवळपास १ हजार ९३६ रुग्णांना दाखल करण्यात आले आणि ९३ रुग्णांवर डेंग्यूचे उपचार करण्यात आले.

काय आहे आरोग्य अधिकाऱ्यांचं म्हणणं?

डेंग्यूच्या रुग्णांच्या वाढीबाबत मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, “नागरिकांनी डेंग्यू आणि मलेरियाच्या डास प्रजननाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाय करणे आवश्यक आहे. डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. पावसाळ्यात लोकांनी स्वच्छ टेरेस ठेवावा. पाणी साचू नये म्हणून प्रयत्न केले पाहिजेत. ज्या घरात डासांची पैदास होण्याची शक्यता आहे, अशा घरांची नियमित स्वच्छता करणे आवश्यक आहे.” या वर्षी पावसाळ्यात जुलै महिन्यात कुर्ल्याच्या एका ३२ वर्षीय व्यक्तीला डेंग्यूमुळे आपला जीव गमावावा लागला आहे. त्याला श्वसनाला त्रास होत होता. त्यानंतर तपासण्या केल्यानंतर डेंग्यू झाल्याचं निदान झालं.

First Published on: August 21, 2018 5:50 PM
Exit mobile version