मुंबईत दिव्यांग मुलं करणार दिंडीतून अवयवदान जनजागृती!

मुंबईत दिव्यांग मुलं करणार दिंडीतून अवयवदान जनजागृती!

अवयवदान

येत्या १२ जुलैला आषाढी एकादशी आहे. या निमित्ताने मुंबईमध्ये अवयवदानाची दिंडी काढली जाणार आहे. परळच्या पालिका शाळेतील दिव्यांग विद्यार्थी दिंडी काढणार आहेत. या दिंडीच्या माध्यमातून ते अवयवदानाबाबत सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत. कारण अवयवदान करणं फार गरजेचं आहे. आजही अनेक लोकांना अवयवदानाबाबत गैरसमजुती आहेत. याच गैरसमजुती दूर करण्यासाठी आणि अवयवदान आणि पर्यावरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही दिंडी काढली जाणार आहे. आषाढी निमित्त मुंबईत १० तारखेला ही दिंडी काढण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेनं कूच करतात.

विद्यार्थी करणार संतांची वेशभूषा

छोटे दिव्यांग वारकरी या अवयवदान दिंडीच्या माध्यमातून अवयवदानाची जनजागृती करणार आहेत. याविषयी कला दिग्दर्शक सुमित पाटील यांनी सांगितलं की, ‘‘महाराष्ट्रात दिव्यांग मुलांची अशा प्रकारे पहिल्यांदाच दिंडी काढली जाणार आहे. परळच्या कोळीबावडी या पालिकेच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थी या दिंडीत सहभागी होणार आहेत. या मुलांना या वारीतून नक्कीच विठ्ठल भेटेल असा आमचा विश्वास आहे. “आषाढी एकादशीच्या निमित्ताने लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आता दिव्यांग विद्यार्थी दिंडी काढणार आहेत. या दिंडीच्या माध्यमातून नागरिकांना अवयवदान करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहेत. याशिवाय दिव्यांग विद्यार्थी विठ्ठल रूक्मिणीसह अनेक संतांची वेशभूषा केलेल्या रुपात पाहायला मिळतील. हे विद्यार्थी गाणी, भजनाद्वारे या दिंडीच्या माध्यमातून अवयवदानाचा जागर करणार आहेत. ३० पेक्षा अधिक विद्यार्थी या दिंडीत सहभागी होणार आहेत.”

दरम्यान, हल्ली वाढलेल्या जनजागृतीमुळे लोकं पुढाकार घेऊन अवयवदानासाठी पुढे येत आहेत. मुंबईत अवयवदानाने सहा महिन्यातच पन्नाशी गाठली आहे. २०१८ साली मुंबईत वर्षभरात एकूण ४८ अवयवदान झाले होते. २०१९ साली ६ महिन्यांतच ५० अवयवदान झाले आहेत. त्यामुळे, आता आणखी पुढाकार घेऊन लोकांना अवयवदान करावं यासाठी हे लहानगे प्रयत्न करणार आहेत.

अॅपेक्स हॉस्पिटलतर्फेही दिंडीचं आयोजन

सामाजिक ऐक्याचा संदेश देणाऱ्या या दिंडीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेऊन अॅपेक्स हॉस्पिटलतर्फेही अवयवदान दिंडीचं आयोजन करण्यात आलं आहे. यंदा या दिंडीचं दुसरं वर्ष आहे. लालबागचा राजा ते वडाळा येथील विठ्ठल मंदिर येथे या दिंडीची सांगता होणार आहे.

First Published on: July 9, 2019 7:05 PM
Exit mobile version