भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

भिवंडी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत

भटके कुत्रे

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. तीन दिवसात दहा जणांना कुत्र्यांनी चावे घेऊन जखमी केले आहे. प्रभाग समिती क्र.1 अंतर्गत असलेल्या गुलजार नगर येथे मोकळ्या मैदानात खेळणार्‍या चार मुलांवर भटक्या कुत्र्याने हल्ला करून त्यांना जखमी केल्याची घटना समोर आली आहे.

अयान फैजान अहमद मोमीन (4 वर्षे) , मो.सिद्दीक हारून शेख ( 7 ) ,जिकरा मुनव्वर मोमीन ( 6),जाहिद सईद मोमीन ( 5 ) अशी कुत्र्याच्या हल्यात जखमी झालेल्या मुलांची नावे आहेत. ही मुले गुलजार नगर येथील अमन अपार्टमेंटसमोरील मोकळ्या जागेत खेळत असताना भटक्या कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. या घटनेमुळे या भागात भीती पसरली आहे. भिवंडी पालिका प्रशासनाने 2008 ते 2013 या पाच वर्षांच्या काळात श्वान नसबंदी कार्यक्रम राबवून 2 कोटी 48 लाख 3 हजार 530 रुपये खर्च करून 23 हजार 612 कुत्र्यांची नसबंदी केली होती. मात्र, त्यानंतर या श्वानबंदीत भ्रष्ट कारभार झाल्याची ओरड झाल्याने श्वान नसबंदी कार्यक्रम बारगळला आहे. त्यामुळे या पाच वर्षांत शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमालीची वाढली असून, सुमारे 12 हजार भटके कुत्रे शहरात असल्याचा दावा केला जात आहे.

First Published on: March 18, 2019 4:02 AM
Exit mobile version