डाकिवली, चांबळे गावकर्‍यांचा मतदानावर बहिष्कार

डाकिवली, चांबळे गावकर्‍यांचा मतदानावर बहिष्कार

रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने संतापलेल्या गावकर्‍यांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा 2019 ची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपली असतांना वाडा तालुक्यातील चांबळे व डाकिवलीच्या नागरिकांनी वाडा – भिवंडी महामार्गाला जोडणार्‍या डाकिवली – चांबळे – लोहपे रस्त्याची दुरावस्था झाल्याने येणार्‍या निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील वाडा तालुक्यामधील डाकिवली व चांबळे गावातील नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. वाडा – भिवंडी महामार्गाला जोडणार्‍या डाकिवली – चांबळे – लोहपे या रस्त्याची दुरावस्था बनली असून या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गेल्या दोन वर्षापासून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दुचाकी व अन्य वाहनांनी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे. रोजच प्रवास करणार्‍या विद्यार्थ्यांचेही हाल होताहेत. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी येत्या 21 तारखेला होणार्‍या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून आमच्या गावातील विद्यार्थी – विद्यार्थी व महिलाही या रस्त्याने नियमित प्रवास करत असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांचे हाल होत आहेत.-— कैलास भोईर, ग्रामस्थ, चांबळे

गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याची खूपच बिकट परिस्थिती झाल्याने व प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच आम्ही या निवडणूकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.-— गजानन भोईर, ग्रामस्थ, चांबळे

First Published on: October 19, 2019 4:46 AM
Exit mobile version