आता मासे विक्रेत्यांना पर्यावरणपूरक फायबरचे बॉक्स!

आता मासे विक्रेत्यांना पर्यावरणपूरक फायबरचे बॉक्स!

मुंबईत प्लास्टिक पिशवीसह थर्माकोल बंदी लागू करण्यात आल्यानंतर मासे विक्री करणार्‍या कोळी महिलांची अडचण होत आहे. ती लक्षात घेऊन मासे टिकवून ठेवण्यासाठी पर्यावरणपूरक प्लास्टिक म्हणजेच फायबरचे बॉक्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या मंडयांमध्ये मासे विक्री करणार्‍या कोळी महिलांना ५०, ६० व ७० लिटर क्षमतेचे प्रत्येकी तीन कंटेनर उपलब्ध करून देण्यात येतील. या कंटेनरच्या खरेदीसाठी कोळी महिलांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे याचा लाभ महापालिकेच्या विविध मंडयांमध्ये असलेल्या एकूण ३७४१ परवानाधारक मासे विक्रेत्या महिलांना मिळणार आहे.

मुंबईत महापालिकेच्या विविध मंडयांमध्ये मासे विक्री करणार्‍या महिला या मासळी खराब होऊ नये म्हणून थर्माकोलच्या बॉक्समध्ये बर्फ टाकून साठवून ठेवतात. त्यात मासळी सुरक्षित ठेवली जाते. परंतु २३ मार्च २०१८ रोजी जारी करण्यात आलेल्या शासनाच्या परिपत्रकानुसार राज्यात जुलैपासून प्लास्टिक पिशवी व थर्माकोलवर बंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. त्यामुळे कोळी महिला आणि त्यांच्या संस्थांकडून तीव्र विरोध होऊ लागला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी तत्कालिन आयुक्त अजोय मेहता यांना पत्र पाठवून मासे विक्रेत्या कोळी महिलांना फायबरचे कंटेनर महापालिकेच्यावतीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यानंतर शिवसेनेचे सचिन पडवळ आणि भाजपच्या शीतल गंभीर यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे कोळी महिलांना प्लास्टिकच्या शीतपेट्या उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या सर्व मागण्यांचा विचार करता महापालिकेच्या नियोजन विभागाने महापालिकेच्या मंडईतील परवानाधारक कोळणींना पर्यावरणपूरक प्लास्टिक कंटेनर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या विविध मंडयांमध्ये पारंपरिक व्यवसाय म्हणून मासे विक्री करणार्‍या ३७४१ कोळी महिला आहेत. या सर्व मासे विक्रेत्या महिलांसाठी ५०,६० व ७० लिटर क्षमतेच्या प्रत्येकी तीन कंटेनर उपलब्ध करून दिले जाणार आहे. या कंटेनर ऐवजी कोळणींना पैसे दिले जाणार आहेत.या तिन्ही कंटेनरसाठी अनुक्रमे २३०० रुपये, ३१५० रुपये आणि ४५५० रुपये याप्रमाणे एकूण १० हजार रुपये याप्रमाणे एकूण ३.७४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कंटेनरच्या खरेदीसाठी मासे विक्रेत्या कोळी महिलांना कंटेनर खरेदीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत, असे नियोजन विभागाच्या सहायक आयुक्त डॉ. संगीता हसनाळे यांनी सांगितले. हा लाभ बाजार विभागाचा परवाना असलेल्या मासे विक्रेत्या महिलांना दिला जणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मासे विक्रेत्यांना कंटेनर खरेदीसाठी देण्यात येणारे पैसे
५० लिटर क्षमता : २३०० रुपये
६० लिटर क्षमता : ३१५० रुपये
७० लिटर क्षमता : ४५५० रुपये
एकूण परवानाधारक मासे विक्रेत्या कोळी भगिनी : ३७४१

First Published on: September 8, 2019 5:22 AM
Exit mobile version