सांताक्रूझवर एल्फिन्स्टनचे सावट!

सांताक्रूझवर एल्फिन्स्टनचे सावट!

Santacruz bridge

एक वर्षापूर्वी पश्चिम रेल्वे मार्गावर २३ सप्टेंबर २०१७ रोजी एल्फिन्स्टन (सध्याचे प्रभादेवी) स्थानकाच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप प्रवाशांनी जीव गमावले होते. त्यानंतर घाईगडबडीत पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील अनेक पुलांचे ऑडिट करण्यात आले होते. मात्र पश्चिम रेल्वेने एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेपासून काही धडा घेतल्याचे दिसून येत नाही. सांताक्रूझ स्थानकावर पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल अपूर्णावस्थेत असल्याने या स्थानकातील नवीन पुलावर प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे सांताक्रूझवरही एल्फिन्स्टन दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत पश्चिम रेल्वेकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतलेली नाही.

सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीच्या नावाखाली 12 सप्टेंबर 2018 रोजी रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केला आहे. 30 नोव्हेंबर 2018 पर्यंत हा पूल पादचार्‍यांसाठी खुला करण्यात येईल, असे आश्वासन पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिले होते. आश्वासनाचा फलकदेखील रेल्वेने स्थानकावर लावला होता. बांधकामाची मुदत संपून ६ दिवस पूर्ण झाले आहेत. पण पुलाचे 10 टक्के कामसुद्धा अजून पूर्ण झालेले नाही. लावलेला फलक काढण्यात आला.
हे रेल्वेच्या सुस्त आणि गलथान कारभाराचेच उदाहरण आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे. येथून प्रवास करणारे प्रवासी प्रचंड वैतागलेले आहेत.

गर्दी निवारणासाठी येथे जे पोलीस उभे केले जातात, तेसुद्धा अपुरे पडत आहेत. सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा तुम्ही किती अंत पाहणार आहात? का अजून एखाद्या दुर्घटनेची वाट पाहत आहात? असा प्रश्न प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला विचारला जाऊ लागला आहे.

प्रवाशांच्या जीवाशी खेळ

सांताक्रूझ रेल्वे स्थानकावर दर दिवशी होणारी प्रवाशांची ये-जा पाहता या पुलाच्या दुरुस्तीचा दिलेला कालावधी खूप जास्त आहे. एकाच वेळी दोन ठिकाणी दुरुस्ती होत असल्याने एकाच पुलावरून सर्व प्रवाशांना ये-जा करावी लागते. पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पूल बंद असल्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे प्रवासी, शाळा-कॉलेजमध्ये जाणारी मुले याच पुलाचा वापर करतात. त्यामुळे गर्दीच्या वेळेस रेल्वेच्या मुख्य पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पूल चढून प्लॅटफॉर्मवर जायलाच 15 मिनिटे लागतात. अशा वेळेस एल्फिन्स्टन पुलावर घडलेल्या दुर्घटनेची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही. सुस्तावलेले रेल्वे प्रशासन अशा दुर्घटनेची वाट पाहत आहे का? पुलाचे काम पूर्ण करायला त्यांना कोणता मुहूर्त हवा आहे?

महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांचे हाल

30 नोव्हेंबर 2018 पर्यंत जुना पूल तोडून नवीन पूल रहदारीसाठी सुरू होईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने दिले होते. अशा आश्वासनाचा फलक रेल्वे स्थानकावर लावण्यात आला होता. तो आता काढून टाकण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर जाऊन डिसेंबर महिना सुरू झाला आहे. पण अजून या पुलाचे 10 टक्के कामही झालेले नाही. त्यामुळे शाळा-कॉलेजचे विद्यार्थी, महिला आणि वयोवृद्ध प्रवाशांना रेल्वे स्थानकावर जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.मात्र पश्चिम रेल्वे प्रशासन यावर गंभीर्याने विचार करताना दिसून येत नाही. एल्फिन्स्टन स्थानकाच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची दुर्घटना झाल्यावर अशा दुर्घटना भविष्यात घडू नयेत, यासाठी उपायोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष समिती स्थापना करण्यात आली होती. ज्यात रेल्वे प्रशासन, पालिका अधिकारी, पोलीस अधिकारी आणि अन्य महत्त्वाच्या अधिकार्‍यांचा सहभाग होता. रेल्वे स्थानकांत चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असलेल्या असुरक्षित ठिकाणांचा आढावा घेऊन त्यावर उपाययोजना सुचवण्याचे काम या समितीकडे सोपावण्यात आले होते.

अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकाच्या माध्यमातून रेल्वे स्थानकातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करून सुधारणा सुचवण्याचे काम सुरू करण्यात आले. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या भागांतील ३९ हून अधिक ठिकाणी उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्याचा एक भाग म्हणून सांताक्रुझ स्थानकावरील पादचारी पुलाचे काम सुरू आहे, असे रेल्वेच्या एक वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले आहे.

आम्ही सांताक्रूझ रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. हे काम डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत.
– रवींद्र भाकर,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

पश्चिम रेल्वेमार्फत सांताक्रूझच्या पादचारी पुलांची दुरुस्ती करण्यात येत आहे. या दुरुस्तीच्या कालावधीमध्ये एल्फिन्स्टन रेल्वे पुलासारखी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी मनसेकडून पश्चिम रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांशी पत्रव्यवहार केला आहे. आम्ही त्यांना ३१ डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याची डेडलाईन दिली आहे. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर रेल्वे विरोधात मनसे स्टाईल आंदोलन करू.-अखिल चित्रे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना.

First Published on: December 7, 2018 6:13 AM
Exit mobile version