पुलावरून पडल्यानंतरही प्रवाशांना काढले ढिगार्‍याखालून

पुलावरून पडल्यानंतरही प्रवाशांना काढले ढिगार्‍याखालून

Aatmaram yegade

एखादी दुर्घटना घडल्यानंतर मोबाईलवरून चित्रिकरण करण्यासाठी लोकांची घाई असते. परंतु गुरुवारी झालेल्या सीएसएमटी पूल दुर्घटनेमध्ये स्वत: पुलावरून खाली पडल्यानंतरही आपल्या जीवाची पर्वा न करता मरिन ड्राईव्ह येथील केळी विक्रेते आत्माराम एडगे यांनी ढिगार्‍याखाली अडकलेल्या तीन ते चार जणांना बाहेर काढत माणूसकीचा वेगळाच आदर्श मांडला. मात्र थोड्यावेळाने त्यांच्या पायाची हालचाल बंद झाल्याने ते रस्त्याच्या बाजूला बसले.

वाशी येथील रहिवासी असलेले आत्माराम एडगे यांचा मरिन ड्राईव्ह येथे केळी विक्रीचा व्यवसाय आहे. गुरुवारी सायंकाळी केळी विक्री बंद करून एडगे घरी जाण्यासाठी निघाले. सीएसएमटी पुलावरून जात असताना अचानक पूल कोसळला. पुलाच्या स्लॅबसोबत एडगेही खाली पडले. त्याचवेळी पुलावरून जाणारे काही प्रवाशी एडगे यांच्या अंगावर पडले. पुल कोसळण्याचा प्रंचड आवाज कानावर आला. मात्र काय घडते हे कळत नव्हते. वरून खाली पडल्यामुळे डोळ्यासमोर संपूर्णत: अंधार पसरलेला होता. कमरेला थोडासा मार लागल्याचे कळले. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत मी तातडीने माझ्या आजूबाजुला ढिगार्‍याखाली सापडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी उठलो. माझ्या आसपासच्या तीन ते चार लोकांना मी ढिगार्‍याखालून बाहेर काढले व त्यांना सुरक्षित जागी नेले. त्यानंतर मी पुन्हा ढिगार्‍याखाली अडकलेल्यांना काढण्यासाठी गेलो असता माझ्या पायाची हालचाल होईनाशी झाली. त्यामुळे मी रस्त्याच्या बाजूला जाऊन बसलो. त्यानंतर पोलिसांनी मला हॉस्पिटलमध्ये नेल्याचे आत्माराम एडगे यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर आत्माराम यांचे तातडीने एक्स-रे, सोनोग्राफी केली. त्यांच्या कमरेला मार लागल्याने त्यांच्या कमरेखालील भाग सुजलेला आहे. त्यामुळे त्यांना हालचाल करता येत नाही.

केळी विक्रीवर एडगे यांचे घर चालते. एडगे यांना तीन मुले असून मोठी मुलगी सहावीला तर दुसरा मुलगा तिसरीमध्ये शिकत आहे. तिसर्‍या मुलाला यावर्षी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे. कमरेला मार लागल्याने आता वजन उचलणे शक्य होईल का? कामच करता आले नाही तर संसाराचा गाढा कसा हाकायचा असा प्रश्न एडगे यांच्यासमोर निर्माण झाला आहे.

First Published on: March 16, 2019 5:06 AM
Exit mobile version