दंड भरण्यावरून वाद, क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये हाणामारी

दंड भरण्यावरून वाद, क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये हाणामारी

दंड भरण्यावरून वाद, क्लीनअप मार्शल-नागरिकांमध्ये हाणामारी

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, यासाठी पालिकेच्या ‘क्लीनअप मार्शल’ कडून नजर ठेवण्यात येत आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर क्लीनअप मार्शलमार्फत दंडात्मक कारवाई करण्यात येते. मात्र कधी कधी या कारवाईवरून नागरिक आणि क्लीनअप मार्शल यांच्यात वादविवाद होत असतात. मात्र मंगळवारी जुहू येथे अशाच एका प्रकरणात कारवाई करण्यावरून एक नागरिक व क्लीनअप मार्शल यांच्यातील वाद विकोपाला जाऊन त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

क्लीनअप मार्शलवर आणखीन काही नागरिकांनी हात उचलल्यामुळे त्याला घटनास्थळापासून काढता पाय घेत पळ काढला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला आहे. मात्र हे प्रकरण पोलिसात गेल्याचे समजते. परंतु पालिकेकडून अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र या प्रकरणात सुरुवात क्लीनअप मार्शलने संबंधित नागरिकावर हात उगारल्याने झाल्याचे या घटनेसंबंधित व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्याने समोर आले आहे.

मुंबई महापालिकेने तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आर.ए. राजीव यांच्या माध्यमातून व पुढाकारातून २००६ मध्ये शहर स्वच्छ राखण्यासाठी व सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून, थुंकून, लघूशंका करून अथवा अन्य कारणास्तव घाण करणाऱ्या नागरिकांना वचक बसावा यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद असणारा एक कायदा तयार केला.

मात्र या कायद्याची अंमलबजावणी करताना आतापर्यंत क्लिनअप मार्शल व संबंधित नागरिक यांच्यात वादविवाद होणे, शिवराळ भाषा वापरणे, हातवारे करणे, मारहाण करणे, भ्याड हल्ला करणे, क्लिनअप मार्शलकडूनही तोडपाणी करणे, धमकावणे आदी प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत पालिकेकडून क्लिनअप मार्शल यांच्या ठिकाणी देखरेख करण्यासाठी अथवा अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठोस उपाययोजना न करण्यात आल्यामुळे अशा घटना वारंवार घडताना दिसत आहेत.

मंगळवारी जुहू येथे एका रस्त्यावर एका क्लिनअप मार्शलने एका नागरिकाच्या तोंडावरील मास्क जरा खाली सरकल्याने त्याच्यावर कारवाई करण्याच्या हेतूने त्या नागरिकाचा त्या अवस्थेतील एक फोटो मोबाईल कॅमऱ्याने काढला. त्यामुळे संबंधित नागरिकाला त्याचा राग आला. या घटनाप्रकरणावरून क्लिनअप मार्शल व त्या नागरिकाचा वाद झाला व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. नागरिकाने त्या क्लिनमार्शलने हात उचलल्याचा आरोप केला. त्यावर तेथे जमलेल्या नागरिकांनी त्या क्लिनअप मार्शलवर हात उगारला. त्यावेळी त्या क्लिनअप मार्शलने जोरदार प्रतिकार केला. मात्र नागरिकांची संख्या वाढल्याने व त्याला मारहाण जास्त होऊ लागल्याने त्याने घटनास्थळापासून वेळीच पळ काढल्याने तो थोडक्यात बचावल्याचे समजते.

सदर प्रकरण पोलिसात गेले असून त्या क्लिनअप मार्शलच्या डोक्याला जास्त मार लागल्याने त्याच्या डोक्याचे सिटी स्कॅनही करण्यात आले असल्याचे समजते. या घटनेचे तीव्र पडसाद पालिका स्थायी समितीच्या आगामी बैठकीत उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

First Published on: September 13, 2021 11:07 PM
Exit mobile version