कल्याणमध्ये चायनिज हॉटेलला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

कल्याणमध्ये चायनिज हॉटेलला आग; अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

आग प्रातिनिधिक छायाचित्र

कल्याणमध्ये मध्यरात्री चायनिजच्या हॉटेलला भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी गेलेल्या अग्निशमन दलाच्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे तर एक जवान गंभीर जखमी झाले आहेत. कल्याण पश्चिमेकडील गोल्डन पार्क परिसरामध्ये ही घटना घडली आहे. गोल्डन पार्कमध्ये रस्त्याच्या शेजारी असलेल्या चायनिजच्या हॉटेलला मध्यरात्री सव्वा एकच्या दरम्यान भीषण आग लागली. ही आग विझवण्यासाठी कल्याण अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी आले. मात्र आग विझवत असताना सिलेंडरचा स्फोट झाला आणि यामध्ये आगीमध्ये होरपळून एक जवानाचा जागीच मृत्यू झाला तर एक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

अशी घडली घटना

कल्याणच्या गोल्डन पार्क परिसरात मध्यरात्री सव्वा एक वाजता कल्याणच्या आधारवाडी अग्निशमन दलाच्या कार्यलयात एका नागरिकाने कॉल करून माहिती दिली की, गोल्डन पार्कच्या बाजूला असलेल्या एका शटर बंद चायनीज हॉटेलमधून धूर निघत आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. धूर निघत असलेल्या चायनीजच्या दुकानाचे शटर उघडताच चायनीज हॉटेलमधील सिलेंडरचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये जगन आमले या अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला, तर संदीप पालवे हा जवान गंभीर जखमी झाला. जखमी जवानावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जगन आमले यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

दिवाळीत दोन जवानांचा मृत्यू

दरम्यान, ऐन दिवाळीमध्ये कल्याण पूर्व भागातील चक्की नाका परिसरात असलेल्या एका विहिरीतीमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला होता. कल्याणातील चक्कीनाका परिसरातील भीमा शंकर मंदिराशेजारी असलेल्या रसायनमिश्रीत विहिरीने ही घटना घडली होती. साफसफाईसाठी विहरीत उतरलेल्या ३ सफाई कामगरांचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह बाहे काढताना २ अग्निशमन दलाच्या जवानांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच मध्यरात्री आणखी एका अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे. या घटनेमुळे अग्निशमन दलाच्या जवानांमध्ये शोककळा पसरली आहे.

First Published on: November 29, 2018 9:37 AM
Exit mobile version