ताडदेवमध्ये आगीचा भडका, आरटीओ कार्यालय जळून खाक!

ताडदेवमध्ये आगीचा भडका, आरटीओ कार्यालय जळून खाक!

ताडदेव इथल्या आरटीओ कार्यालयाला आग लागली.

पहाटे 5:30 च्या सुमारास ताडदेव इथल्या आरटीओ कार्यालयाला आग लागली. या आगीत आरटीओ कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली तरी महत्वाची कागदपत्रे आणि मोठ्या प्रमाणात कार्यालयाचे नुकसान झाले आहे. ताडदेव इथल्या सीताराम घाडीगांवकर या मार्गावर हे आरटीओचे कार्यालय आहे. पहाटेच्या सुमारास अचानक या ठिकाणी आग लागली आणि काही क्षणांतच आगीचे लोळ उठायला लागले. या आगीत आरटीओ कार्यालय जळून खाक झाले असून कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे, महागड्या खुर्च्या, पेपर्स,एसी युनिट, कपबोर्ड, वाहतूक परवाना कागदपत्रे आणि कार्यालयातील संगणक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी ही आग लागली होती. लगेचच अग्निशमन दलाला याबाबत माहिती देण्यात आली. अवघ्या 15 मिनिटांतच अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन दलाच्या गाड्यासहित घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करू लागले. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. मात्र, आरटीओ कार्यालय जळून खाक झाले होते. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी महत्वाच्या कागदपत्रांची राख झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात नुकसानदेखील झालेले आहे.

तर मोठा स्फोट झाला असता

सीताराम घाडीगांवकर मार्गावर आरटीओ कार्यालयाला लागूनच थोड्याच अंतरावर सीएनजी गॅसचा पंप आहे. आरटीओ कार्यालयाला लागलेल्या आगीमुळे ती आग हळूहळू पसरत होती. मात्र, वेळीच अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे ही आग नियंत्रणात आली. नाहीतर या आगीमुळे सीएनजी पंपाचा स्फोट झाला असता अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे . दिवसभर या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. अनेक टॅक्सी या ठिकाणी गॅस भरायला रांगेत उभ्या असतात. आरटीओ कार्यालयाची ही इमारत अतिशय जुनी आहे, त्यामुळे महत्वाच्या कागदपत्रांचा साठा या कार्यालयात होता. या आज सकाळी लागलेल्या आगीमुळे कागदपत्रे आणि वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे.

First Published on: August 6, 2018 5:00 AM
Exit mobile version