पहिला स्मार्ट न्युज पेपर स्टॉल ठाण्यात

पहिला स्मार्ट न्युज पेपर स्टॉल ठाण्यात

ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात मंगळवारी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.

ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनतर्फे स्मार्ट ठाणे स्मार्ट न्यूज पेपर स्टॉल या संकल्पनेवर बनवण्यात आलेल्या स्मार्ट न्यूज पेपर स्टॉलचे उद्घाटन आमदार संजय केळकर आणि ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हरी पवार, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जेवण डफळे, संजय पावशे, राजीव धावरे, अजय उतेकर, संतोष पाडावे, सिद्धेश चव्हाण असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, दिलीप चिंचोली, वैभव म्हात्रे, भरत कुथे, गणेश शेडगे यावेळी उपस्थित होते.

स्टॉलवर वृत्तपत्रविक्री होत असताना ऊन, पाऊस, वार्‍यापासून विक्रेत्याचे रक्षण व्हायला हवे. या उद्देशाने हे स्टॉल बनवण्यात आले आहेत. या स्टॉलच्या खाली एक छोटेखानी जागा उपलब्ध करून देण्यात आली असून जेणेकरून रिटर्नची वर्तमानपत्रे, इतर साहित्य ठेवता येईल.

ठाणे महापालिकेने या स्टॉलला परवाना दिलेला आहे. आता या स्टॉलवर वृत्तपत्र विक्रेतेही जाहिराती स्वीकारतील आणि त्यातून त्यांना अधिक मोबदलाही मिळेल. यापुढे स्टॉलवरच कुरिअरचे पिकअप आणि ड्रॉप पॉईंट सुरू करण्याचे नियोजन आहे. येणार्‍या काळात ठाण्यातील सर्व स्टॉल हे एकाच प्रकारचे असतील. त्यामुळे वृत्तपत्रांच्या स्टॉलची एक वेगळी ओळख निर्माण होईल. वृत्तपत्र विक्रेते आता महिन्याची पेपरची बिले घेण्यासाठी ऑनलाईन मोबाईल अ‍ॅप्सचाही वापर करणार आहेत आणि ऑनलाइन ट्रांजेक्शनचाही वापर करतील. त्यामुळे केवळ पेपरविक्रीवर अवलंबून न राहता, घरोघरी डिलिव्हरीचे काम करण्याचा मानस आहे, अशी माहिती यावेळी ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांनी दिली.

First Published on: December 4, 2019 2:39 AM
Exit mobile version