राज्यात पहिल्यांदा दिव्यांगांना मिळणार ब्रेल लिपीत वोटर स्लिप

राज्यात पहिल्यांदा दिव्यांगांना मिळणार ब्रेल लिपीत वोटर स्लिप

दिव्यांगांना मिळणार ब्रेल लिपीत वोटर स्लिप

लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी तसेच मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपयायोजना केल्या जात आहेत. आता दिव्यांगांनाही मतदान करताना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी देखील विविध उपाययोजना आयोगाकडून करण्यात येत असून, राज्यात पहिल्यांदाच दिव्यांगाना दिली जाणारी वोटर स्लिप ही ब्रेल लिपीमध्ये असणार आहे. यामुळे राज्यातील ४८ हजार १३९ दिव्यांगाना मतदान करणे आता सुलभ होणार आहे. ब्रेल लिपीतील वोटर स्लिप बनवण्याची जबाबदारी वरळी येथील नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड (NAB) या संस्थेकडे देण्यात आली असून, डमी मतपत्रिका तसेच इव्हिएम मशिनवर लावण्यात येणाऱ्या न्युमेरिक स्टिकरची जबाबदारी देखील या संस्थेकडे देण्यात आली आहे.

वोटर स्लिप बनवण्यासाठी दिव्यांगांची मदत

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे दिव्यांगासाठी देण्यात येणारी ही वोटर स्लिप बनवण्याचे काम नॅब संस्थेचे ६० कर्मचारी करत असून, यामध्ये १० दिव्यांगांची मदत घेतली जात आहे. विशेष बाब म्हणजे दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर गेल्यावर नॅबने तयार केलेली डमी मतपत्रिका दिली जाणार आहे. यामुळे दिव्यांग उमेदवाराच्या लक्षात येईल की, त्यांना कोणत्या उमेदवाराला मत द्यायचे आहे. तसेच यानंतर इव्हिएम मशिनवर देखील न्युमरिक नंबर लावले जातील जेणेकरून दिव्यांग मतदाराला मत द्यायला सोपे जाणार आहे.

पहिल्या टप्प्यासाठी ब्रेल लिपीचा वापर

दरम्यान, गुरुवारी राज्यातील पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले. सात जागांसाठी पार पडलेल्या या मतदानावेळी वोटर स्लिप ही ब्रेल लिपीत तयार करून पाठवण्यात आली. मात्र कमी वेळ मिळाल्याने आता बाकीच्या टप्प्यातील मतदानासाठी न्युमेरिक स्टिकर, डमी मतपत्रिका तसेच वोटर स्लिप बनण्याचे काम जोरात सुरू आहे.

असा होइल फायदा

१. मतदार यादीतील नाव ब्रेल लिपीत वाचल्यामुळे आपेल नाव योग्य आहे का? हे तपासून उमेदवाराचा अनुक्रमांक ब्रेल लिपी मध्ये तपासता येईल.

२. ईव्हीएम मशीनवर सुद्धा अनुक्रमांक हे ब्रेल लिपी असल्यामुळे योग्य उमेदवाराच्या अनुक्रमांकाचे बटन दाबून दिव्यांग मतदार मतदान सहजरीत्या करू शकेल.

३. यामुळे अंध मतदाराचे मतदान गुप्त राहील. शिवाय त्याला कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः मतदानाचा अधिकार बजावता येईल.

“आम्ही आयोगाला दिव्यांगाचे वोटर आयडी हे ब्रेल लिपीत असावे असे सांगितले होते. मात्र वेळ न मिळाल्याने आता वोटर स्लिप आणि डमी मतदार यादी ब्रेल लिपीत आम्ही बनवत आहोत. पण आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिव्यांगाना ब्रेल लिपित वोटर आयडी देखील मिळू शकेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.” – पल्लवी कदम, कार्यकारी संचालक, नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड

First Published on: April 13, 2019 5:00 AM
Exit mobile version