पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मिळणार पगारी रजा

पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मिळणार पगारी रजा

राज्यातील कोल्हापूर सांगली आणि इतर पूरग्रस्त भागांतील एसटी कर्मचार्‍यांना अखेर गूडन्यूज मिळाली आहे. अतिवृष्टीमुळे कामावर हजर न राहू शकलेल्या कर्मचार्‍यांचा पगार कपात करण्याच्या निर्णयाला विरोध झाल्यानंतर अखेर प्रशासनाने या कर्मचार्‍यांना पगारी रजा देण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला आहे. यासंदर्भातील वृत्त ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने यासंदर्भातील निर्णय घेत एसटी कर्मचार्‍यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाचे सर्व एसटी कर्मचार्‍यांकडून स्वागत करण्यात आले आहे.

यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर,सांगली आणि सातारामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती. त्यामुळे या विभागातील एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांना मोठा फटका बसलेला होता. पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना मदत करण्याऐवजी एसटी महामंडळाने कामावर हजर नसल्याचे कारण देत सरसकट एसटी कर्मचार्‍यांची गैरहजेरीचा शेरा लावल्यासंदर्भात सर्वप्रथम दैनिक ‘आपलं महानगर’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर एसटी महामंडळाने दखल घेत फक्त पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना 3 महिन्यांचे अग्रीम वेतन देण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, विशेष पगारी रजा देण्यात आली नव्हती. सतत पाठपुरावा केल्यानंतर अखेर एसटी महामंडळाने पूरग्रस्त एसटी कर्मचार्‍यांना पगारी रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधित परिपत्रक सर्व एसटीच्या सर्व आगारात पाठवण्यात आलेले आहे. ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर, सांगली, कराड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व इतर ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर आला होता. या कालावधीत एसटीची अनेक विभागीय आगारे बंद होती.

अतिवृष्टीमुळे कर्मचार्‍यांना घरी राहावे लागल्यामुळे रजा घ्यावी लागली.त्यांच्यासाठी विशेष रजा मंजूर करण्याचा निर्णय चांगला असून या निर्णयामुळे पूरग्रस्त कर्मचार्‍यांना न्याय मिळाला आहे.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. तसेच हा मुद्दा सतत उचलून धरल्यामुळे दैनिक ‘आपलं महानगर’चे सुद्धा आभार मानतो.                              – आमदार भाई जगताप ,अध्यक्ष, महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी कॉँग्रेस

First Published on: September 23, 2019 2:19 AM
Exit mobile version