सोशल डिस्टन्सिंग पाळत दहिहंडीचे थर लावणार – गोपिकांचा निर्धार

सोशल डिस्टन्सिंग पाळत दहिहंडीचे थर लावणार – गोपिकांचा निर्धार

दरवर्षी दहिहंडी उत्सवाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. यंदा कोरोनाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दहिहंडी उत्सवही साजरा न करण्याचा निर्णय दहिहंडी समन्वय समितीने घेतला आहे. परंतु आपली संस्कृती टिकली पाहिजे आणि संकटांवर मात करणे हेच गोविंदांचे ध्येय असते हे दाखवून देण्यासाठी पार्ले स्पोर्ट्स क्लबने बुधवारी सोशल डिस्टन्सिंग राखत मानाची दहिहंडी उभारून थर लावण्याचा निर्धार केला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील सर्वच सार्वजनिक उत्सवांवर निर्बंध आले आहेत. त्यामुळे नागरिकांनीही उत्सव मर्यादित स्वरुपात करण्याला पसंती दिली आहे. दहिहंडी हा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा उत्सव समजला जातो. दरवर्षी मुंबईमध्ये लाखोंची बक्षिसे असलेल्या हंड्या फोडल्या जातात. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्यावर विरजन आले असले तरी दहिहंडीचा सराव करण्यासाठी रक्त आटवणार्‍या गोविंदा व गोपिकांनी रविवारी मुंबईमध्ये हजारपेक्षा अधिक रक्त बाटल्यांचे संकलन केले. त्यानंतर आता विलेपार्लेतील पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या गोपिकांनी बुधवारी सोशल डिस्टन्सिंग राखत दहिहंडीचे थर लावण्याचा निर्धार केला आहे. त्यानुसार गोपिकांनी तयारीही केली आहे. दहिहंडी हा उत्सव आपली संस्कृती आहे. ही संस्कृती कायम टिकून राहावी यासाठी आम्ही थर लावण्याचा निर्णय घेतला आहे. दहिहंडी उत्सवाला खेळाचा दर्जा मिळावा यासाठी गोविंदांनी पाच ते सहा वर्षे न्यायालयात लढा दिला. त्यामुळे यंदा आम्ही मानाची दहिहंडी रचणार आहोत. दहिहंडीच्या दिवशी थर लावण्यासाठी मंडप उभारणीसाठी वापरण्यात येणार्‍या शिडीचा वापर करण्यात येणार आहे. शिडीचा वापर करून थर रचण्यासंदर्भात क्लबच्या गोपिकांनी सरावही केला आहे. त्यानुसार बुधवारी दहिहंडीच्या दिवशी थर रचण्यात येणार आहे, अशी माहिती दहिहंडी समन्वय समितीच्या सचिव आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्ष गीता झगडे यांनी दिली.

सोशल डिस्टंसिंग राखत सराव करताना गोपिका

स्पेन दौरा हुकल्याचे शल्य

यंदा मुंबईचे विशेष गोविंदा पथक आपले कौशल्य दाखवण्यासाठी स्पेनला जाणार होते. परंतु ही संधी हुकल्याचे शल्य वाटत आहे. यापूर्वी मुंबईचा गोविंदाने अमेरिका, लंडन व स्पेनमध्ये आपले कौशल्य सादर केले आहेत. पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या गोपिकांनी यंदा सात थर रचत आपला विक्रम अबाधित राखण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनामुळे यंदा ते शक्य होणार नसले तरी पुढील वर्षी आम्ही नक्कीच सात थर लावू असा विश्वास पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्ष गीता झगडे यांनी व्यक्त केल्या.

First Published on: August 10, 2020 4:46 PM
Exit mobile version