कामगारांच्या वेतनरकमेत बीव्हीजी कंपनीकडून अफरातफर

कामगारांच्या वेतनरकमेत  बीव्हीजी कंपनीकडून अफरातफर

navi_mumbai_municipal

भारत विकास ग्रुप (BVG) कंपनीने तब्बल ३३९ कामगारांच्या बोनस रजा रोखीकरण आणि 13 महिन्यांच्या थकबाकी वाटपात ९८ लाख रुपयांची अफरातफर केली असल्याने कामगारांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. सोमवारपर्यंत ही रक्कम न मिळाल्यास दोन दिवसांचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगारांनी दिला आहे. सदर प्रकार जर वेळेवर कामगारांच्या लक्षात आला नसता तर कंपनीने कामगारांचे लाखो रुपये हडप केले असते, असा आरोप समाज समता कामगार संघटनेकडून करण्यात आला आहे. ज्या पैशांसाठी आम्ही प्रखर लढा दिला, तो पैसा कंपनीला खाऊ देणार नाही, असा इशारा संघटनेचे सचिव मंगेश लाड यांनी दिला आहे. त्यामुळे भारत विकास ग्रुप (BVG) कंपनी अडचणीत आली आहे.

भारत विकास ग्रुप (BVG) कंपनीचे अनेक कामगार नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या विविध खात्यात कंत्राटी पद्धतीवर काम करत आहेत. त्यातील ३३९ कामगारांच्या वेतनातील रकमेत अफरातफर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. गेल्या महिन्यात १३ महिन्यांच्या फरकाची रक्कम कामगारांना देण्याचे आदेश मनपाकडून देण्यात आले आहेत. अनेक कामगारांना दिवाळीपूर्व संपूर्ण वेतन देण्यात आले. त्याचवेळी भारत विकास ग्रुप (BVG) कंपनीकडूनही वाशी (175), नेरूळ (74), ऐरोली (72), बेलापूरमधील (18), सफाई कामगार अशा एकूण 339 कामगारांना 13 महिन्यांची थकबाकी सुधारित दराने दिवाळीपूर्वी वाटप करण्यात आली. परंतु प्रत्यक्षात थकबाकी पोटी कामगारांच्या खात्यात आलेली रक्कम व नवी मुंबई महानगर पालिकेने ठेकेदार भारत विकास ग्रुप (BVG) यांना दिलेल्या रकमेत कमतरता असल्याची बाब समोर आली.

सन 2017-18 च्या बोनस व रजारोखीकरण्याच्या रकमेत ऐरोली, नेरूळ आणि बेलापूर या रूग्णालयातील कामगारांच्या बोनसमध्ये प्रती कामगार साधारण 3000 रूपये आणि वाशी रूग्णालयाच्या कामगारांच्या बोनस रजारोखीकरणामध्ये 1500 ते 1800 रूपये कमी असल्याचेही समोर आले आहे. एकूणच हा अपहार ठेकेदाराने हेतुपुरस्सर केला आहे. कामगारांना भ्रष्टाचार लक्षात आल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने ही रक्कम परत देण्याचे मान्य केले आहे. परंतु प्रत्यक्षात कामगारांना रक्कम कधी मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे अशा कंपनीवर फसवणुकीवरून फौजदारी गुन्हा दाखल करावा व उर्वरित रक्कम त्वरित कामगारांना परत द्यावी, अशी मागणी करत मंगळवारपासून रूग्णालयाच्या आवारात आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मी मनपाच्या ऐरोली हॉस्पिटलमध्ये गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी पद्धतीवर काम करत असून कंत्राटदाराकडून आम्हाला ज्यावेळी फरकाची रक्कम मिळाली त्यावेळी आम्हाला संशय आला. त्यामुळे मी त्याची चाचपणी केली तर तब्बल २८ हजारांची तफावत आढळून आली. इतर सहकार्‍यांचीही चौकशी केली असता त्यांनाही कमी रक्कम मिळाली असल्याचे कळले. कंपनीने कमी दिलेली रक्कम ही आमच्या हक्काची असून ती कंपनीला कोणत्याही परिस्थितीत आम्ही खाऊ देणार नाही.
-अजय पवार, सफाई कामगार, ऐरोली हॉस्पीटल

फरकाची रक्कम व बोनस एकदाच देण्यात आला असला तरी तीन ते चार महिन्यांच्या वेतनाच्या रकमेत ३ हजारांचा फरक आहे.२० ते २१ हजार रुपये प्रती महिना वेतन मिळणे आम्हाला अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १८ हजारच हातात आले. कंत्राटदाराला लवकरच फरकाची रक्कम देण्याचा आम्ही इशारा दिला आहे. नाही तर पुढच्या सप्ताहात दोन दिवसीय आंदोलन आम्ही करू.
-नकुल पाटील, सफाई कामगार,नेरूळ हॉस्पिटल

कामगारांना देण्यात येणारे वेतन हे आम्हाला दिवाळीच्या २ ते ३ दिवसांपूर्वी मिळाले. त्यामुळे ते तत्काळ देणे शक्य नव्हते. तरीही काही प्रमाणात रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित रक्कम लवकरच देण्यात येणार आहे.
– संग्राम सावंत, मुख्य व्यवस्थापक, भारत विकास ग्रुप (BVG) कंपनी.

प्रशासनाकडून कामगारांची फरकाची रक्कम ठेकेदारास देण्यात आली आहे. त्यांनी कोणाला कमी दिली व कशी दिली हे त्याचा रिपोर्ट आल्यावरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याची चौकशी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
-दयानंद कटके, वैद्यकीय अधीक्षक,नवी मुंबई महापालिका.

First Published on: November 17, 2018 6:29 AM
Exit mobile version