इंधन दरवाढीचा गणपती विसर्जनाला फटका, ट्रेलर ट्रकचे भाव वाढले

इंधन दरवाढीचा गणपती विसर्जनाला फटका, ट्रेलर ट्रकचे भाव वाढले

दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे भाव वाढत असताना त्याचा फटका आता मोठ्या गणेशोस्तव मंडळांनाही बसला आहे. गणपती विसर्जनासाठी लागणार्‍या ट्रक, टेम्पो, ट्रेलरच्या भाड्यात इंधन दरवाढीमुळे वाढ झाली आहे. देवाचे कार्य म्हणून आम्ही पूर्वी गणपती विसर्जनासाठी गाड्या फक्त डिझेलचे पैसे घेऊन अथवा मोफत द्यायचो. मात्र आता इंधन दरवाढीमुळे समाजसेवा करणे शक्य नाही. गाडी मालक ही विसर्जनाला गाड्या द्यायला तयार नाहीत. मात्र चागले दर मिळाले तरच गाड्या देणे शक्य होणार आहे, असे नवी मुंबई ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष नरेश चाळके यांनी सांगितले.

पूर्वी डिझेल स्वस्त असल्याने गणपती मंडळांना आम्ही एक देवाचे कार्य म्हणून फक्त डिझेलचे पैसे घेऊन नाहीतर मोफतच गाड्या द्यायचो. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. इंधनाचे भाव वाढत असल्याने सर्व ट्रान्सपोर्टवाले त्रस्त आहेत. त्यामुळे आता पूर्वीसारखे शक्य नाही. गणपती विसर्जनदरम्यान डिझेल आणि ड्रायव्हर दोन्ही वेगळे लागत असल्याने त्यांचा खर्च जास्त होतो. अनेक वेळा विसर्जनादरम्यान वेळ कमी जास्त होत असल्याने त्याचा फटकाही वाहन मालकांना पडतो.

मंडळाचे पदाधिकारी गणपती विसर्जनानंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करतात. त्याचा त्रासअनेक वेळा वाहन मालकांना होतो. त्यामुळे आता वाहन चालक, वाहने देण्यास तयार नाहीत. सध्या टेम्पोसाठी ६ ते ७ हजार,ट्रेलरसाठी ८ ते १० हजार व ट्रकसाठी ५ ते ६ हजार रुपये असे दर सुरु आहेत. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा २० ते ३० टक्के दर वाढले आहेत.अनेक सार्वजनिक मंडळे एकाच गाडीत दोन ते तीन गणपती नेत असल्याने त्यांना परवडते. मोठ्या गणेशोत्सव मंडळांना ट्रेलर अथवा मोठ्या ट्रकशिवाय पर्याय नाही.

ट्रक ,ट्रेलर अथवा टेम्पो गणपती विसर्जनासाठी भाड्याने द्यायचा म्हणजे त्यात तीन दिवस जातात. एक दिवस अगोदर सजावट आणि विसर्जन झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी गाडी ताब्यात. त्यामुळे वाढीव दर द्यायला मंडळांना परवडत नाही. अनेक गाडी मालकांनी आपल्या गाड्या कंपन्यांना लावल्या आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात गाडी टंचाई निर्माण होणार आहे. – नरेश चाळके, उपाध्यक्ष, नवी मुंबई ट्रान्सपोर्ट असोसिएशन

गेल्या दोन दिवसांपासून आम्ही गणपती विसर्जनासाठी गाडीची शोध घेत आहोत. मात्र गाडी मिळत नाही आहे. गाडी मालक इंधन दरवाढीमुळे गाड्या द्यायला तयार नाहीत. गेल्यावर्षी आम्हाला ५ हजार रुपयांत गणपती विसर्जनासाठी गाडी मिळाली होती. मात्र आत तेच गाडी मालक १० हजार रुपये मागत आहेत. तेही पैसे देण्याची तयारी आम्ही दर्शवली असता गाड्याच उपलब्ध नाहीत. त्यामुळे बिकट परिस्थिती आहे. – दिलीप घोडेकर, प्रमुख सल्लागार, नेरूळ सेक्टर २ सार्वजनिक गणेशोत्सव

First Published on: September 22, 2018 3:07 AM
Exit mobile version