“भावी मुख्यमंत्री राज ठाकरे..”;शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

“भावी मुख्यमंत्री राज ठाकरे..”;शिवसेना भवनासमोर मनसेची बॅनरबाजी

दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गुढीपाडव्याच्या निमित्ताने दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचा पाडवा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नेहमीच राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवरून राजकीय नेत्यांवर आणि इतर राजकीय पक्षांवर निशाणा साधत असतात. त्यामुळे यावर्षी ते कोणावर निशाणा साधणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसर आणि शिवसेना भवन परिसरात लागलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. “महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे..” अशा आशयाचे बॅनर मनसेकडून लावण्यात आले आहेत.

महत्वातची बाब म्हणजे हे बॅनर शिवसेना भवनाच्या अगदी समोर लावण्यात आल्याने मनसेकडून ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे का, असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. या बॅनरबाबत राज ठाकरे यांनी कोणतेही मत अद्याप तरी व्यक्त केलेले नाही, ज्यामुळे यावर त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, आज (ता. २२ मार्च) सर्वाधिक चर्चा होत आहे ती म्हणजे राज ठाकरे यांच्या भाषणाची. आजच्या भाषणासाठी राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्क येथे उपस्थित राहणार आहेत. यासाठीची जय्यत तयारी शिवाजी पार्क येथे करण्यात आलेली आहे. तसेच, कार्यकर्त्यांना या सभेमध्ये घेऊन येण्यासाठी मनसेकडून बसेसची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे.

याआधी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले होते. याबाबत अजित पवार यांनी नाही पण सुप्रिया सुळे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, आता राज ठाकरे हे त्यांच्या आजच्या पाडव्याच्या सभेमधून कोणावर आपली तोफ डागणार आणि कोणावर निशाणा साधणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. कारण मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला होऊन सुद्धा राज ठाकरे यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले नव्हते किंवा कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती, त्यामुळे ते आज याबाबत काय बोलणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.


हेही वाचा – गिरगाव, डोंबिवलीत तरुणाईचा सळसळता उत्साह, पारंपरिक वेषात शोभायात्रा गजबजल्या

First Published on: March 22, 2023 10:25 AM
Exit mobile version