गॅमन हाऊस आगीवर नियंत्रण, २ जण जखमी

गॅमन हाऊस आगीवर नियंत्रण, २ जण जखमी

गॅमन हाऊस आगीवर नियंत्रण, २ जण जखमी

मुंबई अग्निशमन दल भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये लागलेली भीषण आग विझविण्यात व्यस्त असतानाच शनिवारी पहाटेच्या सुमारास प्रभादेवी येथील ५ मजली ग‌‌ॅमन हाऊस या बिल्डिंगमधील बेसमेंटमध्ये अचानक आग लागल्याची घटना घडली. ही आग साडेबारा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. ही आग विझवताना अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, वीर सावरकर मार्ग, येथील गॅमन हाऊस या पाच मजली व्यावसायिक इमारतीमधील बेसमेंटमध्ये शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. आजूबाजूच्या नागरिकांनी आग बघायला काहीशी गर्दी केली. या आगीबाबतची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तर अग्निशमन दलाच्या जवानांनाही या आगीची माहिती मिळताच त्यांनी फायर इंजिन, वॉटर टँकर यांच्यासह घटनास्थळी धाव घेऊन आग विझविण्याचे सुरू केले.

या आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नसली तरी आग विझवताना अग्निशमन दलाचे जवान हरीचंद्र वाडेकर ( ५५) आणि अभिजित तांडेल (४९) हे जखमी झाले. त्यावर जखमी वाडेकर यांना तात्काळ औषधोपचार देण्यात आले. तर तांडेल यांना उपचारासाठी नजीकच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर आदींच्या साहाय्याने या आगीवर संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रण मिळवून आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र ही आग का व कशी लागली, त्याची कारणे शोधण्यासाठी मुंबई पोलीस व अग्निशमन दलाचे जवान शोध घेत आहेत.

First Published on: March 27, 2021 8:06 PM
Exit mobile version