गणेश नाईकांना भाजपच्या स्टेजवर जागा नाही; जयंत पाटील यांचे खोचक ट्विट

गणेश नाईकांना भाजपच्या स्टेजवर जागा नाही; जयंत पाटील यांचे खोचक ट्विट

गणेश नाईक गडकरी रंगायतनच्या बाहेर पडताना

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत ठाण्यात आज झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे माजी ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांना स्टेजवर बसायला जागा न मिळाल्यामुळे गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र माजी खासदार संजीव नाईक हे कार्यक्रम सोडून निघून गेले. गणेश नाईक यांनी नवी मुंबई येथे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ४८ नगरसेवकांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र त्यानंतरच्या पहिल्याच कार्यक्रमात त्यांना स्टेजवर जागा न दिल्यामुळे ठाणे जिल्ह्यात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना देखील स्टेजवर बसायला जागा न मिळाल्यामुळे सोमय्या यांनी स्टेजच्याखाली मांडी घालून बसणे पसंत केले.

माजी खासदार किरीट सोमय्या यांनी खालीच बसणे पसंत केले.

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटविल्याबद्दल भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणेश नाईक यांच्या नावाचा उल्लेख देखील सूत्रसंचालकाने केला. मात्र मंचावर बसायला जागा उपलब्ध नसल्यामुळे नाईक यांनी आल्या पावली माघारी जाण्याचा निर्णय घेतला.

जयंत पाटील यांचे वर्मावर बोट

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र ही संधी साधत गणेश नाईक आणि भाजपवर शरसंधान साधले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले की, “व्यासपीठावर जागा न मिळाल्याने गणेश नाईक यांना कार्यक्रमातून जाताना पाहून मला दुःख वाटले. गणेश नाईक यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला व्यासपीठावर जागा न देणारी भाजप ही खऱ्या अर्थाने ‘पार्टी विद डिफ्रन्स’ आहे!”

गणेश नाईक हे राष्ट्रवादीत असताना ठाणे जिल्ह्याचे नेते म्हणून परिचित होते. ठाण्याचे माजी पालकमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले होते. राष्ट्रवादीचा ठाण्यात कोणताही कार्यक्रम असला तरी गणेश नाईक यांना मंचावर मानाचे स्थान दिले जायचे. मात्र भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना अवमान सहन करावा लागत असल्याची चर्चा आता ठाणे जिल्ह्यात रंगू लागली आहे. जयंत पाटील यांनी बरोबर या वर्मावर बोट ठेवत ट्विट केले असल्याचे दिसून येते.

First Published on: September 15, 2019 10:17 PM
Exit mobile version