पालिकेचा गलथान कारभार, शौचालय बांधूनही निरुपयोगी

पालिकेचा गलथान कारभार,  शौचालय बांधूनही निरुपयोगी

घरात शौचालये बांधून घेतली; पण मलनि:सारण वाहिनी नसल्यामुळे त्यांचा वापर करणे अशक्य होऊन बसले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून ‘हर घर मे शौचालय’ ही योजना जाहीर केली आहे. प्रत्येक घरात शौचालय असावे, अशी यामागे अपेक्षा आहे. पण महानगरपालिकेच्या गलथानपणाचा फटका मुलुंड येथील पाच कुटुंबांना बसला आहे. या कुटुंबांनी घरात शौचालये बांधून घेतली; पण मलनि:सारण वाहिनी नसल्यामुळे त्यांचा वापर करणे अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून त्यांना घरात शौचालये असूनही सार्वजनिक शौचालयांमध्ये जावे लागत आहे.

मुलुंड हनुमानपाडा येथील जाधव चाळीत पालिकेच्या कामाचा अजब नमुना उघडकीस आला आहे. दोन वर्षांपूर्वी प्रधानमंत्री योजनेअंतर्गत मुंबई महापालिकेने ‘हर घर मै शौचालय’ योजना येथे राबविली. योजनेतून येथील काही रहिवाशांनी २०१६ साली घरात शौचालये बांधली. परंतु मलनि:सारण वाहिनी नसल्यामुळे या पाच कुटुंबांना शौचालयाचा वापर करता येत नाही. जाधव चाळीमधील घरांना शौचालय बांधण्याची परवानगी मिळाल्यामुळे कैलास पाटील, अमोल सातवे, भानुदास पाटील, काशिनाथ टाकवे या रहिवाशांनी स्व-खर्चाने शौचालय बांधले. पालिकेने टार्गेट पूर्ण करण्यासाठी योजना राबवली; पण जिथे मलनि:सारण वाहिनीच नाही, तिथे शौचालयांना परवानगी देण्यात आली.

शौचालय असूनही खर्च

घरात शौचालय असूनही त्याचा वापर करता येत नाही. सार्वजनिक शौचालयांचा वापर करावा लागतो. एका कुटुंबासाठी महिन्याला ६० रुपये द्यावे लागतात. आजूबाजूला मोठी वस्ती असल्यामुळे सार्वजनिक शौचालयातही खूप गर्दी होते. यामुळे रहिवाशांना कामाला जाण्यासाठी उशीर होतो.

फक्त अडीच हजार जमा

एक शौचालय बांधण्यासाठी अंदाजे पंचवीस हजार रुपये खर्च झाला. पण सुनंदा पाटील यांच्या खात्यावर सरकारकडून फक्त अडीच हजार इतकी तुटपुंजी रक्कम जमा झाली.

नागरिकांचे वेट अ‍ॅण्ड वॉच

जाधव चाळीतील पाच कुटुंबांची कुचंबणा पाहून बाकी चाळीतील नागरिकांनीही शौचालय बांधणे पुढे ढकलले आहे. जाधव चाळीच्या पुढील भागात अंदाजे ५०० घरांमध्ये शौचालये बांधणे बाकी आहे.

 

हनुमान पाडा भागात शौचालयाचा प्रश्न मोठा आहे. नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. यासाठी काही कुटुंबांनी ‘हर घर मै शौचालय,’ योजनेतून शौचालय बांधले. परंतु दोन वर्षे झाले तरीही स्वतःच्या घरातील शौचालय वापरता येत नाही. त्यामुळे ही योजना निरर्थक आहे. मलनिःसारण वाहिनी आहे की, नाही हे पालिकेने आधी पहायला हवे होते.
भूषण पाटील,शाखाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

हनुमान पाडा खूप मोठा आहे. मी आता याबद्दल काही भाष्य करू शकत नाही. या संबंधित चाळीची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करेन किशोर गांधी, सहाय्यक आयुक्त, टी विभाग.

२ वर्षांपासून शौचालय बांधून पूर्ण झाले आहे. तरीही ते आम्हाला वापरता येत नाही. छोट्या घरात या शौचालयामुळे खूपच अडगळ होत आहे. पालिकेने लवकरात लवकर प्रश्न सोडवावा – सुनंदा पाटील, त्रस्त रहिवाशी.

First Published on: July 18, 2018 7:00 AM
Exit mobile version