घाटकोपर रेल्वेच्या तिकीट घरावर हातोडा

घाटकोपर रेल्वेच्या तिकीट घरावर हातोडा

घाटकोपर स्थानकातील गर्दी मोठ्या झपाट्याने वाढत आहे. या गर्दीवर उपाय म्हणून घाटकोपर मेट्रो स्थानकातील रेल्वेचे तिकीट घर तसेच स्टेशन मास्तर कार्यालयाची जागा बदलण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे.या दोन स्थानकांतील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चेंगराचेंगरीची एखादी दुर्घटना पिक अवरमध्ये घडू शकण्याची देखील शक्यता आहे.त्यामुळे या गर्दीवर उपाय शोधण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी केली होती.

त्यानुसार रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी गेल्याच आठवड्यात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अधिकार्‍यांनी कोणत्या उपाययोजना राबविता येतील याचा सविस्तर आराखडा तयार करून 30 दिवसांच्या आत रेल्वेमंत्रालयाकडे पाठविण्याचे आदेश दिले होते.तसेच गेल्या शुक्रवारी रेल्वे,मेट्रोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी खासदार मनोज कोटक यांच्या सोबत घाटकोपर स्थानकाची पाहणी देखील केली.

आराखड्यानुसार घाटकोपर स्थानकातील मुख्य पादचारी पुलावरील ऑटोमॅटिक तिकीट यंत्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सध्या 7 यंत्रे आहेत,त्याची संख्या 11 करण्यात येणार आहे.सुरक्षा गेट आणि सामानाची तपासणी करणार्‍या स्कॅनिंग मशिन्सची संख्या देखील वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे प्रवासांचे सामान तपासण्याचे काम लवकर होण्यास मदत होईल.

First Published on: September 19, 2019 5:27 AM
Exit mobile version