शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर भाजप गप्प का?

शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर भाजप गप्प का?

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सोमवारी राज्यातील राजकारणात उमटले. राज्यपालांनी त्वरित महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागून केलेले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आली. शिवरायांविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यावर भाजप गप्प का? असा सवालही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत समर्थ रामदास नसते तर, शिवाजीला कोणी विचारले असते? असे वादग्रस्त विधान करून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत असून जगभरात त्यांचा मोठा नावलौकिक आहे; परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेल्या कोश्यारी यांनी छत्रपतींचा केलेला अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही, त्यांनी आपले विधान मागे घेत महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

भगतसिंह कोश्यारी हे घटनात्मक पदावर बसून इतिहासाची मोडतोड करण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत आहेत. अशा व्यक्तींना राज्यपालपदावर बसण्याचा नैतिक अधिकार नाही, केंद्र सरकारने त्यांना परत बोलवावे, असेही ते म्हणाले.

तर, न्यायालयात सादर केलेल्या पुराव्यांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांची भेट झाल्याचा कोणताही पुरावा नाही. शिवाजी महाराज आणि रामदास यांच्यामध्ये गुरुशिष्याचे नाते असल्याचा देखील कोणताही पुरावा उपलब्ध नाही, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे ऊर्जा स्त्रोत आहेत. समर्थ रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे माझ्या वाचनात आले होते. मात्र इतिहासातील काही नवीन तथ्य लोकांनी मला सांगितली आहेत. या तथ्यांनुसार मी माहिती घेतो आणि त्यानंतर पुढे काय करायचे तो निर्णय घेतो.
-भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

First Published on: March 1, 2022 6:20 AM
Exit mobile version