हिमालय पुलावर अस्वच्छता, प्रवासी नाराज

हिमालय पुलावर अस्वच्छता, प्रवासी नाराज

मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानक व टाइम्स ऑफ इंडिया कार्यालय परिसर यांना जोडणारा हिमालय पूल नव्याने उभारल्यावर ३० मार्चपासून रेल्वे प्रवासी, पादचारी यांच्यासाठी खुला करण्यात आला आहे. मात्र या पुलाची दैनंदिन साफसफाई नीटपणे होत नाही. पुलावरून ये – जा करणाऱ्या प्रवासी, पादचारी यांना याचा नाहक त्रास होत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे हिमालय पुलापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातील एकाही अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्यांना ही बाब निदर्शनास कशी आली नाही, अशी कुजबुज हिमालय पुलावरून जाणाऱ्या प्रवाशांमध्ये ऐकायला मिळाली. मुंबई महापालिका शहरातील कचरा जमा करणे, साफसफाई राखणे, कचरा डंपिंग ग्राउंडपर्यन्त वाहनाने वाहून नेणे व त्या जमा कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे आदी प्रक्रियेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तर मग सात कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या व दररोज हजारो रेल्वे प्रवासी, पादचारी ये – जा करीत असलेल्या हिमालय पुलावर स्वच्छता चांगली स्वच्छता सेवा का नाही ? असा सवाल पादचारी, प्रवासी उपस्थित करीत आहेत.
हिमालय पुलाचा काही भाग १४ मार्च २०१९ रोजी सायंकाळच्या सुमारास हिमालय पुलाचा मोठा भाग अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये, सात जणांचा बळी गेला तर ३२ जण जखमी झाले होते.

त्यामुळे पालिकेने सदर धोकादायक जुना पूल पाडून त्या ठिकाणी सात कोटी रुपये खर्चून चार वर्षात नवीन पुलाची उभारणी केली. त्यानंतर हा पूल ३० मार्च रोजी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला. मात्र सध्या या पुलावर , जिन्यावर कचरा पडून असल्याचे निदर्शनास येते. गुरुवारी या पुलावर प्लास्टिक कागद, वृत्तपत्र, कागदाचे तुकडे, पाण्याची बाटली, सिगारेटचे रिकामे पॅकेट, चपात्या, रिकामी काडीपेटी एवढेच नव्हे तर एका प्लास्टिकच्या काळ्या पिशवीत दारूची रिकामी बाटली अशा प्रकारचा कचरा आढळून आला. त्यामुळे हिमालय पुलावरून ये – जा करणाऱ्या प्रवाशांना व पादचारी यांना याचा नाहक त्रास होतो.

First Published on: April 27, 2023 10:22 PM
Exit mobile version